Monday, September 7, 2026

CM Devendra Fadnavis : मुंबईसह महानगरात दहीहंडीला झालेल्या अश्लील लावण्यांची उच्चस्तरीय चौकशी करा!

CM Devendra Fadnavis : मुंबईसह महानगरात दहीहंडीला झालेल्या अश्लील लावण्यांची उच्चस्तरीय चौकशी करा!

- राष्ट्रवादीची मागणी; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर उपस्थित केले सवाल

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये पारंपरिक लावणीच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील डीजे लावणी आणि नृत्य प्रकारांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाने केली असून, यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्यात आले आहे. शासनाचे आदेश असतानाही मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तांनी या प्रकारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. (CM Devendra Fadnavis)

शनिवारी पार पडलेल्या दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबई आणि ठाणे परिसरात आयोजित काही कार्यक्रमांमध्ये नियमांना डावलून अश्लील नृत्यप्रकार सादर झाल्याचे समोर आले होते. या संदर्भात बोलताना पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, सार्वजनिक ठिकाणी सादर होणाऱ्या नाटक, लोकनाट्य, तमाशा, लावणी व संगीत कार्यक्रमांसाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे (सेन्सॉर बोर्ड) योग्यता प्रमाणपत्र घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. असे असतानाही, अनेक ठिकाणी कोणतीही पूर्वपरवानगी किंवा संहिता न तपापता अशा प्रकारच्या कार्यक्रमांना आयोजकांनी परवानगी कशी दिली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. (CM Devendra Fadnavis)

महाराष्ट्राची संस्कृती आणि लोककलेची प्रतिष्ठा जपण्यासाठी यापूर्वीच शासनाने मार्गदर्शक तत्त्वे व स्थायी आदेश जारी केले आहेत. मात्र, या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्यामुळे विकृत आणि अश्लील सादरीकरणाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. दहीहंडी उत्सव कितीही मोठ्या राजकीय नेत्याचा किंवा व्यक्तीचा असला, तरी कायद्याचे पालन सर्वांसाठी समान असायला हवे, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली आहे.

मागण्या काय?

या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये मुंबई व उपनगरात झालेल्या अशा सर्व डीजे लावणी व नृत्य कार्यक्रमांची सखोल चौकशी करणे, कलाकारांकडे परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र होते किंवा नाही याची पडताळणी करणे, आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजक व कलाकारांवर कायदेशीर गुन्हे दाखल करणे यांचा समावेश आहे. तसेच, शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित पोलीस प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (CM Devendra Fadnavis)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा