Mumbai News : उत्तर मुंबईत सहा ठिकाणी कौशल्य विकास केंद्रांची उभारणी

स्थानिक पातळीवर कार्यरत ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण वर्ग


मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्यात कौशल्य विकास केंद्रासाठी सामंजस्य करार


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उद्योग जगतातील मनुष्यबळाची मागणी पाहता उत्तर मुंबईत सहा ठिकाणी कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून तरूणाईला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्रासाठी पश्चिम उपनगरात विविध ठिकाणी जागांचा शोध घेण्यात येत आहे. उद्योग जगातील बदलत्या तंत्रज्ञानाला कुशल मनुष्यबळाची सांगड घालण्यासाठी या कौशल्य विकास केंद्राची उभारणी करण्यात येईल, असे स्पष्ट करत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्थानिक पातळीवर कार्यरत ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण वर्गही याठिकाणी चालविण्यात यावेत, अशीही सूचना त्यांनी केली.


कांदिवली येथील ठाकुर व्हिलेज याठिकाणी कौशल्य विकास केंद्रासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) यांच्यात सामंजस्य करार शनिवारी ५ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. मुंबई महानगरपालिकेने या कौशल्य विकास केंद्रासाठी समाज कल्याण सुविधा भूखंड उपलब्ध करून दिला आहे. कौशल्य विकास केंद्रासाठीच्या सामंजस्य करारप्रसंगी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी, नगरसेविका निशा परुळेकर, नगरसेवक दीपक(बाळा) तावडे, अतिरिक्‍त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे, एनएसडीसीचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी संजीव सिंह तसेच महिंद्रा समुह आणि लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो समुहाचे अधिकारी उपस्थित होते.



याप्रसंगी बोलतांना पियुष गोयल यांनी उद्योग जगताला मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज आहे. अशावेळी विविध ठिकाणी कार्यरत मनुष्यबळाने अद्ययावत प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवनवीन रोजगाराच्या संधी मिळवायला हव्यात. त्यासाठी सायंकाळच्या वेळी तसेच आठवड्याच्या शेवटी कौशल्य विकास केंद्राच्या ठिकाणी प्रशिक्षणाचे वर्ग उपलब्ध करून देण्यात येतील. तरुणाईला विविध भाषा आत्मसात व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असेही ते म्हणाले. उत्तर मुंबईत हॉटेल उद्योग जगताचा होणारा विस्तार पाहता या क्षेत्रात आवश्यक मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कौशल्य विकास केंद्रात प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, असेही केंद्रीय मंत्री गोयल यांनी नमूद केले.कृत्रिम बुद्धिमत्ता, इन्क्युबेशन सेंटर, अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन या केंद्राचा वापर रोजगार निर्मितीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. विविध ठिकाणी कार्यरत मनुष्यबळाला नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही पीयूष गोयल यांनी सांगितले.


उपमहापौर संजय घाडी म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, रिअल इस्टेट क्षेत्राने घेतलेली भरारी पाहता त्यादृष्टीने प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे. उद्योग जगताच्या मागणीनुसार अधिक कुशल कामगार वर्ग उपलब्ध करून देण्यात कौशल्य विकास केंद्रांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितले. उद्योग जगताला हव्या असणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा वेळोवेळी केल्यास हे पाऊल आधुनिक भारताच्या दिशेने पुढे जाईल. मुंबई सोबतच ग्रामीण महाराष्ट्रासाठी देखील कौशल्य विकास केंद्रातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही उपमहापौरांनी व्यक्त केला.


तर अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे म्हणाल्या की, उद्योग जगतासाठी आवश्यक प्रशिक्षण वर्ग उपलब्ध करून देणे यामध्ये कौशल्य विकास केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. पायाभूत सुविधांचे निर्माण पाहता अद्ययावत कुशल मनुष्यबळाची गरज आहे. त्यासोबतच उद्योग जगाच्या कुशल मनुष्यबळाची सांगड घालण्यासाठी संयुक्त विद्यमाने प्र‌शिक्षण वर्गासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विशेष क्षेत्रासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे शक्य होईल. नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात तसेच कुशल मनुष्यबळाची संख्या वाढविण्यात कौशल्य विकास केंद्राचा मोलाचा वाटा असेल, असा विश्वासही लवंगारे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Underground Local: पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, नोकरदारांना दिलासा; चर्चगेट- विरार भूमिगत रेल्वे मार्गाचा प्रस्ताव?

मुंबई: पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) चर्चगेट (Churchgate) ते विरार (Virar) स्थानकादरम्यान भूमिगत उपनगरीय रेल्वे (Underground Local) नेटवर्क

Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत थेट तिसरा क्रमांक

Mumbai News: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. IQAir च्या

Land Registration Rules : सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक, फसवणूक रोखण्यासाठी महसूल विभागाचा निर्णय

मुंबई : सामायिक सातबारा उताऱ्यावर नोंद असलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांत सहहिस्सेदारांची फसवणूक

BMC Fixed Deposits : महापालिकेच्या मुदत ठेवींच्या मुद्द्यावरून थेट पक्षांतरवर घसरले नगरसेवक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेतील मुदतठेवींमधील रक्कम कमी होत असल्याने याबाबत चिंता व्यक्त करत

BMC Water Facilities : मुंबईतील सर्व पाणपोईंची माहिती सादर करा, स्थायी समिती अध्यक्षांनी दिले प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत वाढत्या उष्म्यामुळे घामाची लाही लाही होत असून यासाठी पिण्याच्या पाण्याची

BMC News : मुंबईतील सर्वच बॅनर गुरुवारपर्यंत साफ करून टाका, स्थायी समितीने केली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्लेक्समुक्त करण्याची घोषणा महापौरांनी केल्यानंतर त्यांनी स्वत: च्या