Monday, September 7, 2026

Garib Nagar : गरीब नगरमधील 100 झोपडपट्टीवासीयांना मिळणार हक्काचे घर; सप्टेंबरअखेर पुनर्वसन पूर्ण करण्याचे MMRDAचे नियोजन

Garib Nagar : गरीब नगरमधील 100 झोपडपट्टीवासीयांना मिळणार हक्काचे घर; सप्टेंबरअखेर पुनर्वसन पूर्ण करण्याचे MMRDAचे नियोजन

मुंबई :  गरीब नगरमधील पात्र कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरातील 100 पात्र प्रकल्पग्रस्त झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. मात्र, संबंधित पुनर्वसन इमारतींना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळाल्यानंतरच लाभार्थ्यांना घरांचा प्रत्यक्ष ताबा दिला जाणार आहे. (Garib Nagar )

गरीब नगर परिसरात एकूण 500 झोपड्या होत्या. त्यापैकी 100 कुटुंबे पात्र ठरली, तर 400 झोपड्या अपात्र असल्याचे निश्चित करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मे महिन्यात या 400 अपात्र झोपड्या हटवण्यात आल्या. आता पात्र कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण केल्यानंतर उर्वरित 100 झोपड्यांबाबत पुढील कारवाई केली जाणार आहे.

पात्र कुटुंबांचे पुनर्वसन एचडीआयएल कुर्ला प्रीमियर आणि भंडारी मेटलर्जी या प्रकल्पांमध्ये करण्यात येत आहे. एमएमआरडीएच्या माहितीनुसार, एचडीआयएल कुर्ला प्रकल्पात 16 कुटुंबांना सदनिका देण्यात आल्या आहेत. यापैकी 11 कुटुंबांना वाटप पत्र मिळाले असून 7 कुटुंबांना घरांचा ताबाही देण्यात आला आहे. उर्वरित 4 कुटुंबांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे.

भंडारी मेटलर्जी प्रकल्पातील सर्व 84 पात्र कुटुंबांना वाटप पत्र देण्यात आले आहे. मात्र, एसआरएकडून आवश्यक OC मिळणे बाकी असल्याने घरांच्या चाव्या देण्यास विलंब होत आहे. एमएमआरडीएने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 6 ऑक्टोबर 2026 पर्यंतची मुदत मागितली आहे. ( Bandra Garib Nagar )

पात्र कुटुंबांना घरांचा ताबा मिळाल्यानंतर उर्वरित 100 झोपड्या हटवण्यासाठी एमएमआरडीए रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पात्र कुटुंबांना पर्यायी घर मिळाल्यानंतरच उर्वरित झोपड्या हटवल्या जाणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >