पालघर : पालघरमधील (Palghar News) एका खासगी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे आणि तेथे गोंधळ घालणे शिवसेना पदाधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निर्देशांनुसार आणि पक्षाच्या शिस्तपालन समितीच्या शिफारशीवरून पालघर जिल्ह्यातील सात मुख्य पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
'रिलीफ हॉस्पिटल'च्या आयसीयूमध्ये २५ ते ३० कार्यकर्त्यांचा गोंधळ
दहीहंडीच्या उत्सवात दुखापत झालेल्या एका गोविंदाच्या उपचाराच्या खर्चावरून हा संपूर्ण वाद सुरू झाला होता. या वादानंतर मध्यरात्रीच्या सुमारास सुमारे २५ ते ३० कार्यकर्त्यांनी पालघर येथील 'रिलीफ हॉस्पिटल'च्या अतिदक्षता विभागात (ICU) थेट प्रवेश केला आणि मोठा राडा घातला. अतिदक्षता विभागात अशा प्रकारे गोंधळ घातल्यामुळे रुग्णालयातील रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे
कुंदन बाळकृष्ण संखे – जिल्हाप्रमुख
राहुल रामदास घरत – शहरप्रमुख
मनिष उर्फ विक्की संखे – उपतालुकाप्रमुख
साईराज पाटील – युवासेना जिल्हाप्रमुख
रोहित गावी – युवासेना उपतालुकाप्रमुख
राहुल संखे – उपतालुकाप्रमुख
ऋषभ वारे – युवासेना विधानसभा प्रमुख
दहीहंडीतील जखमी गोविंदांवरील उपचारांवरून वादाची ठिणगी
#WATCH | 17 Booked After Dispute Over Treatment Of Injured Govindas#Govinda #Palghar #MaharashtraNews pic.twitter.com/A9w5MAlvQb
— Free Press Journal (@fpjindia) September 7, 2026
पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडीदरम्यान मानवी मनोरे थर रचताना काही गोविंदा खाली पडून जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रिलीफ रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी काहींवर प्राथमिक उपचार केले, तर गंभीर जखमी गोविंदांच्या सीटी स्कॅन (CT Scan) आणि एक्स-रे (X-Ray) सारख्या महत्त्वाच्या चाचण्या केल्या. विशेषतः डोक्याला आणि पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या रुग्णांना डॉक्टरांनी २४ तास निरीक्षणाखाली ठेवण्याचा सल्ला दिला होता.
१९,८६६ रुपयांच्या बिलावरून मध्यरात्री वाद
जखमी गोविंदांच्या वैद्यकीय चाचण्या आणि उपचाराचे एकूण बिल १९,८६६ रुपये झाले होते. या बिलाची रक्कम पाहून शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पारा चढला. मध्यरात्रीच्या सुमारास हे पदाधिकारी रुग्णालयात पोहोचले. "एवढे बिल का झाले? या चाचण्या करायची काय गरज होती?" असे प्रश्न विचारत त्यांनी तेथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी अरेरावी करण्यास सुरुवात केली.
कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली, महिला स्टाफला धमकावले
बिलावरून सुरू झालेली ही हुज्जत हळूहळू हिंसक बनली. रागाच्या भरात एका पदाधिकाऱ्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या थेट कानाखाली मारली. एवढ्यावरच न थांबता, तेथे उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना आणि परिचारिकांना शिवीगाळ करत धमकावण्यात आले. या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.
मुख्य आरोपी शहरप्रमुखाला अटक; १७ जणांवर गुन्हा दाखल
या राड्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पालघर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अधिकृत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत नवीन भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली १७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शिवसेनेचा शहरप्रमुख राहुल घरत याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.






