Tuesday, September 8, 2026

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver :  गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. यंदा गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांना टोल (पथकर) माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली. ८ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन परिपत्रक (GR) जारी करण्यात आले आहे.

'अटल सेतू'सह प्रमुख महामार्गांवर टोलमाफी

गणेशभक्तांचा प्रवास आर्थिकदृष्ट्या सुलभ व्हावा, यासाठी ११ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत टोलमाफी लागू राहील. ही सवलत खालील प्रमुख मार्गांवर मिळेल.

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH 66)

मुंबई–बंगळूर राष्ट्रीय महामार्ग (NH 48)

अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतू

सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि MSRDC च्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणारे सर्व संबंधित रस्ते.

'गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन' पास अनिवार्य; परतीच्या प्रवासासाठीही वैध

टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी वाहनांवर विशेष स्टिकर/पास असणे आवश्यक आहे.

पासवर काय असेल ? : वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाईल.

कुठे मिळणार? : स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) येथे हे पास उपलब्ध असतील.

परतीचा प्रवास : हाच पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य धरला जाणार असल्याने गणेशभक्तांना परत येतानाही टोल भरावा लागणार नाही.

एसटी बसेसनाही मिळणार सवलत

खासगी वाहनांप्रमाणेच राज्याच्या विविध भागांतून कोकणात जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRDC / ST) बसेसनाही या पथकरमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लालपरीने प्रवास करणाऱ्या हजारो सर्वसामान्य प्रवाशांनाही शासनाच्या या निर्णयाचा थेट फायदा होईल.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन

गणेशोत्सवात महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होते. टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस, वाहतूक पोलीस, PWD आणि RTO यांना परस्परांच्या समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पास वितरण आणि तपासणीची प्रक्रिया जलद ठेवण्यावर प्रशासनाचा भर असेल. "गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या भावनेशी जोडलेला सण आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी व्हावा यासाठीच शासनाने हा निर्णय घेतला आहे." : शिवेंद्रसिंहराजे भोंसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >