Wednesday, September 9, 2026

Ban on Dolby sound systems : धुळ्यात गणेश मंडळांना मोठा धक्का ! डॉल्बी आणि लेझर लाईटवर थेट बंदी, उल्लंघन केल्यास गुन्हा

Ban on Dolby sound systems : धुळ्यात गणेश मंडळांना मोठा धक्का ! डॉल्बी आणि लेझर लाईटवर थेट बंदी, उल्लंघन केल्यास गुन्हा

Ban on Dolby sound systems : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाची तयारी सुरू असतानाच धुळे जिल्हा पोलिसांनी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या उत्सवातील मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टिम आणि लेझर लाईटच्या वापरावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मिरवणुकांसाठी हा आदेश लागू राहणार आहे. त्यामुळे दरवर्षी डॉल्बी आणि लेझर शोवर मोठा खर्च करणाऱ्या गणेश मंडळांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे.

गेल्या वर्षीच्या घटनांनंतर पोलिसांचा निर्णय

मागील वर्षी गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बीच्या अतिवापरामुळे नागरिकांना आरोग्यविषयक त्रास झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मोठ्या आवाजामुळे कानाचे विकार, छातीत धडधड आणि अस्वस्थता यासारख्या तक्रारी करण्यात आल्या. तर उच्च क्षमतेच्या लेझर लाईटमुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि रस्त्यावरील नागरिकांच्या डोळ्यांना इजा होण्याच्या घटनाही घडल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी यंदा कठोर भूमिका घेतली आहे.

डॉल्बी किंवा लेझर वापरला तर थेट गुन्हा

मिरवणुकीदरम्यान अतिआवाज, लेझर लाईट आणि मोठ्या गर्दीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, कोणतेही मंडळ, आयोजक किंवा व्यक्ती डॉल्बी सिस्टिम किंवा लेझर लाईटचा वापर करताना आढळल्यास थेट गुन्हा दाखल करून कठोर फौजदारी कारवाई केली जाईल. म्हणजेच यंदा मिरवणुकीत नियम मोडणं मंडळांना चांगलंच महागात पडू शकतं.

पारंपरिक वाद्यांवर भर

डॉल्बी आणि लेझरला बंदी असल्याने यंदा गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवातील मिरवणुका अधिक शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण ठेवण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे. मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून उत्सव साजरा करावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मिरवणुकांदरम्यान नियमांचं पालन होतंय की नाही, यावर पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांसोबतच पोलीस पथकं आणि भरारी पथकांच्या माध्यमातून विशेष देखरेख केली जाणार आहे.

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ (१) अंतर्गत हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. तसंच गणेश मंडळांचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिकांनी शांतता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी राखून उत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे यंदा धुळ्यात गणेशोत्सवाचा जल्लोष डॉल्बी आणि लेझरशिवाय होणार आहे. मात्र, नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची थेट कारवाई होणार असल्याने मंडळांनी आतापासूनच आपल्या मिरवणुकीच्या नियोजनात बदल करण्याची वेळ आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >