Wednesday, September 9, 2026

Jalgaon Accident News : जळगावात भरधाव कंटेनर पलटी, तरुणाचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : जळगावात भरधाव कंटेनर पलटी, तरुणाचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : पाळधी ते तरसोद बायपासवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरचा अचानक ताबा सुटला आणि काही क्षणांतच कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. या भीषण अपघातात दोनगाव बुद्रुक, ता. धरणगाव येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर दोनगाव बुद्रुकसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तरुणाचा जागीच मृत्यू

पाळधी बायपास महामार्गावरून कंटेनर जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा अचानक सुटला. त्यानंतर कंटेनर भररस्त्यात पलटी झाला. या अपघातात दोनगाव बुद्रुक येथील तरुण गंभीररीत्या जखमी झाला. मात्र अपघाताची तीव्रता इतकी होती की, त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. (Jalgaon Accident News)

अपघातानंतर बायपासवर नागरिकांची गर्दी

कंटेनर पलटी झाल्याचा मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ बायपासवरील वाहतुकीवरही परिणाम झाला. घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली.

पाटील बंधूंची घटनास्थळी धाव

अपघाताची माहिती मिळताच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने मदतकार्याला गती देण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिका पाचारण करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्यासोबतच पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला. (Jalgaon Accident News)

दोनगाव बुद्रुकवर शोककळा

या तरुणाच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचताच नागरिकांमध्ये शोककळा पसरली. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कोळी समाजातूनही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत पंचनामा आणि अन्य आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. कंटेनरचा वेग किती होता, चालकाचा ताबा नेमका कशामुळे सुटला आणि अपघातामागे आणखी काही कारण होतं का, याचा तपास सध्या सुरू आहे. या भीषण अपघाताचा नेमका घटनाक्रम आणि कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >