Wednesday, September 9, 2026

SIR voter list : 'एसआयआर' प्रक्रियेनंतर मतदार यादीवर दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

SIR voter list : 'एसआयआर' प्रक्रियेनंतर मतदार यादीवर दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण-२०२६ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या असून, नवमतदारांसह मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांना या कालावधीत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना-६ मध्ये अर्ज करता येणार आहे. मतदार यादीतील एखाद्या नावाच्या समावेशावर हरकत असल्यास संबंधित मतदारसंघातील मतदाराला नमुना-७ मध्ये अर्ज करता येईल. याशिवाय मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती, मतदार ओळखपत्र बदलणे किंवा दिव्यांग चिन्हांकनासाठी नमुना-८ मध्ये अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारसंघाच्या आत स्थलांतर झाल्यामुळे पत्ता बदलायचा असल्यासही नमुना-८ मध्ये अर्ज करता येणार आहे. त्याचप्रमाणे मतदारसंघाबाहेर स्थलांतर झालेल्या मतदारांसाठीही पत्ता बदलाची स्वतंत्र नोंद नमुना-८ अंतर्गत करता येणार असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

दावे आणि हरकती दाखल झाल्यानंतर त्यासंदर्भातील यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर सात दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेत दाखल झालेल्या दावे-हरकतींचा तपशीलही निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.

खोटी माहिती दिल्यास तुरुंगवास

दरम्यान, मतदार यादीच्या पुनरिक्षणाच्या अनुषंगाने किंवा मतदार यादीतील नोंदींबाबत खोटे विधान अथवा घोषणा करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची तरतूद आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१नुसार अशा व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >