Wednesday, September 9, 2026

Chandrashekhar Bawankule : अमरावतीतील वाघिणीला जेरबंद करण्यासाठी तातडीने रेस्क्यू मोहीम राबवा; नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : अमरावतीतील वाघिणीला जेरबंद करण्यासाठी तातडीने रेस्क्यू मोहीम राबवा; नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : अमरावती वन विभागातील वाघिणीच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांचा तातडीने बचाव करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने रेस्क्यू पथके रवाना करण्याचे निर्देश दिले आहेत. बाधित भागात तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण मोहिमेदरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाची यंत्रणा पूर्ण क्षमतेने सतर्क ठेवण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.(Chandrashekhar Bawankule)

मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती वन विभागातील वाघिणीच्या हल्ल्याबाबत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये आमदार रवी राणा, गजानन लवटे, उमेश यावलकर, प्रताप अडसड, विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे-पाटील आणि वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर हे अधिकारी उपस्थित होते. याशिवाय, दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) आमदार राजेश वानखडे, प्रवीण तायडे, केवलराम काळे, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अमरावती वन विभागाच्या मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.(Chandrashekhar Bawankule)

तातडीने पथके पाठवण्याचे आणि वडाडा केंद्र सुरू करण्याचे निर्देश

वन्यप्राण्यांच्या हालचालींची माहिती ज्या-ज्या भागातून प्राप्त होत आहे, त्या परिसरात विलंब न करता तात्काळ रेस्क्यू पथक पाठवावे, असे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले. नागरिकांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात. यासोबतच, वडाडा येथील रेस्क्यू सेंटर तातडीने कार्यान्वित करून या मोहिमेसाठी आवश्यक मनुष्यबळ, मजबूत सुरक्षा व्यवस्था आणि आधुनिक साधनसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावी. रेस्क्यू कारवाईदरम्यान मनुष्यबळ किंवा सुरक्षाव्यवस्थेची कोणतीही कमतरता भासणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, अशा सक्त सूचनाही त्यांनी दिल्या.(Chandrashekhar Bawankule)

शेतकऱ्यांचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई प्रस्ताव पाठवा

रेस्क्यू मोहिमेदरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांचे विनाविलंब पंचनामे करून नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार करावा. जिल्हाधिकारी आणि संबंधित मुख्य वनसंरक्षक यांनी परस्पर समन्वयाने हा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. झालेल्या नुकसानीची क्षेत्रनिहाय तसेच हेक्टरनिहाय सविस्तर माहिती प्रस्तावात स्पष्टपणे नमूद करावी, असे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत.(Chandrashekhar Bawankule)

वनमंत्री गणेश नाईक यांच्या महत्त्वाच्या सूचना

या बैठकीत बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मोठी गरज आहे. राज्यात वाघ आणि बिबट्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने अशा घटनांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी एक केंद्रीकृत यंत्रणा उभारण्यासोबतच अतिरिक्त पथके आणि स्वतंत्र टास्क फोर्स तयार करण्याची कार्यवाही तातडीने करावी. नागरिकांकडून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वन्यप्राण्यांच्या वावराची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ घटनास्थळी पोहोचावे, यासाठी २४ तास कार्यरत राहणारी ‘स्मार्ट स्क्वाड’ उभारण्याची सूचनाही त्यांनी केली. याशिवाय, यासाठी एक केंद्रीकृत नियंत्रण कक्ष आणि माहिती तातडीने संबंधित पथकांपर्यंत पोहोचवणारी सक्षम यंत्रणा विकसित करण्यावर त्यांनी भर दिला.(Chandrashekhar Bawankule)

नागरिकांची परिपूर्ण सुरक्षितता, वन्यप्राण्यांचा सुरक्षित आणि त्वरित बचाव, तसेच बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून देणे या तिन्ही महत्त्वाच्या बाबींवर संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने अत्यंत वेगाने कार्यवाही करावी, असे निर्देश या बैठकीच्या शेवटी देण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >