Wednesday, September 9, 2026

Drishyam 3 : अक्षय खन्नाच्या जागी जयदीप अहलावत? 'दृश्यम ३' च्या ट्रेलर लाँचवेळी अभिनेत्याने सोडले मौन म्हणाला, मी अक्षय खन्नाची...

Drishyam 3 : अक्षय खन्नाच्या जागी जयदीप अहलावत? 'दृश्यम ३' च्या ट्रेलर लाँचवेळी अभिनेत्याने सोडले मौन म्हणाला, मी अक्षय खन्नाची...

मुंबई : बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम ३' (Drishyam 3) ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाऐवजी अभिनेता जयदीप अहलावतची (jaydeep Ahlawat) एन्ट्री झाल्याचे समोर आल्यानंतर विविध तर्क-वितर्क लावले जात होते. 'दृश्यम २' (Drishyam 2) मध्ये अक्षय खन्नाने (Akshay Khanna)आयजी तरुण अहलावत ही भूमिका साकारली होती. आता त्याच्या जागी येण्याबाबत आणि अक्षयशी होणाऱ्या तुलनेबाबत जयदीप अहलावतने मौन सोडले आहे.

'मी अक्षय खन्नाची जागा घेतलेली नाही': जयदीप अहलावत

'दृश्यम ३' च्या ट्रेलर लाँच दरम्यान जयदीप अहलावतने स्पष्ट केले की, तो अक्षय खन्नाच्या पात्राची जागा घेत नाहीये. जयदीप म्हणाला, चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर मला कुठेही असं वाटलं नाही की मी अक्षय सर यांच्या जागी येत आहे. चित्रपटात एका संपूर्ण नवीन पात्राची ओळख करून दिली जात आहे. त्यामुळे कोणताही दबाव घेण्याचा प्रश्न येत नाही. तुलना होण्याच्या बाबतीत सांगायचं तर, एक कलाकार म्हणून तुम्ही या गोष्टींचा विचार करत नाही."

नवीन प्रवास आणि वेगळी भूमिका

जयदीपने पुढे स्पष्ट केले की, चित्रपटातील त्याच्या पात्राचा प्रवास पूर्णपणे वेगळा असेल. मीरा (तब्बू) आणि साळगावकर कुटुंबाशी (अजय देवगण) या नव्या पात्राचे वेगळे नाते पाहायला मिळेल. दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी जेव्हा कथा ऐकवली, तेव्हा हे पात्र स्वतंत्र आणि स्वतःचा नवा प्रवास असणारे आहे हे स्पष्ट झाले होते, असेही जयदीपने सांगितले.

अक्षय खन्नाने 'दृश्यम ३' का सोडला?

रिपोर्ट्सनुसार, 'धुरंधर' आणि 'छावा' चित्रपटांच्या यशानंतर अक्षय खन्नाने २१ कोटी रुपयांच्या मानधनाची मागणी केली होती. तसेच, भूमिकेसाठी विग (Wig) वापरण्यावरूनही त्याचा निर्मात्यांशी वाद झाला होता. या मुद्द्यांवर एकमत न झाल्याने अक्षय या चित्रपटातून बाहेर पडल्याचे वृत्त होते. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक (पॅनोरामा स्टुडिओ) यांनी अक्षयच्या एक्झिटबाबत खुलासा केला आहे. अक्षय सुरुवातीला या चित्रपटाबाबत खूप उत्सुक होता. कथा ऐकल्यानंतर त्याने दिग्दर्शकाला मिठी मारली होती आणि चित्रपट ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई करेल असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु, मानधनाबाबत तीन वेळा चर्चा होऊनही आणि लूकबाबतचा वाद न मिटल्याने अक्षयने फोन उचलणे बंद केले. यामुळे पॅनोरामा स्टुडिओने त्याला कायदेशीर नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

स्टार कास्ट आणि प्रदर्शन तारीख

अभिषेक पाठक यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'दृश्यम ३' मध्ये अजय देवगण, तब्बू आणि श्रिया सरन पुन्हा एकदा जुन्याच भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तर जयदीप अहलावत आणि प्रकाश राज हे दोन नवीन कलाकार नव्या भूमिकांमध्ये एन्ट्री करत आहेत. हा बहुप्रतिक्षित चित्रपट २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >