Wednesday, September 9, 2026

Vandana Gupte News: वंदना गुप्ते प्रशासनावर संतापल्या; म्हणाल्या, 'खर्च झेपत नसेल, तर माझ्या पैशांनी...'

Vandana Gupte News: वंदना गुप्ते प्रशासनावर संतापल्या; म्हणाल्या, 'खर्च झेपत नसेल, तर माझ्या पैशांनी...'
मुंबई: प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्री वंदना गुप्ते ह्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चहात्यांच्या मनावर राज्य केले आहे. फक्त अभिनयामुळेच नाही तर, आपल्या परखड आणि रोखठोक मत मांडण्यासाठीही त्या प्रसिद्ध आहेत. अलीकडेच वंदना गुप्ते ह्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी नवी मुंबई विमानतळाचा रस्ता सांगणारा बोर्ड कुठेच नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. व्हिडिओमध्ये वंदना गुप्ते ह्यांनी जर विमानतळ प्रशासनाकडे पैसे बोर्ड लावण्यासाठी पैसे नसतील, तर मी बोर्ड लावून देते, असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.
इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते म्हणाल्या की, "नमस्कार मी वंदना गुप्ते, मी आता मुंबईवरून कोल्हापूरला जाण्यासाठी नवी मुंबई एअरपोर्टवर जायला निघाले आहे. मी शिवाजी पार्कला राहते. तिथून मी 'अटल सेतू' वरून येत आहे. तर त्या रस्त्यावर कुठेही विमानतळावर जाण्यासाठी दाखवणारे दिशा नाहीत किंवा कोणतीही खूण नाही. पुणे किंवा गोव्याला जाण्याच्या दृष्टीने मोठेमोठे फलक लावलेले आहेत; पण हा रस्ता विमानतळाकडे जातो, अशी दाखवणारी कोणतीही खूण नाहीये. आम्ही अंदाज घेत घेत चाललो आहोत आणि माझ्या ड्रायव्हरला असे वाटत आहे की, तो बरोबर चालला आहे."   "पण मला अजूनही कळत नाहीये. एकाही बोर्डवर साधं विमानाचं चित्रसुद्धा नाहीये. सगळीकडे पुणे-बंगळुरू रोड आणि एमएमआरडी रोड असेच लिहिले आहे. या रस्त्यावर एकही एअरपोर्टची किंवा विमानाची खूण का नाहीये हे माहीत नाही. हाच रस्ता जर विमानतळाकडे जाणारा असेल, तर त्यावर लवकरात लवकर दिशादर्शक फलक लावा. नाही तर मला सांगा कुठे लावायचे आहेत ते मी खर्च करते. एअरपोर्टवाल्यांना जर खर्च झेपत नसेल, तर मी माझ्या पैशांनी खर्च करते आणि बोर्ड लावून देते.", असं म्हणत वंदना गुप्ते यांनी विमानतळ प्रशासनाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
"अरे देवा... हे खरंच खूपच गोंधळून टाकणारं आहे... एक छोटासा बोर्ड एअरपोर्टसाठी दाखवला होता, पण आमचा ड्रायव्हर बोलतोय की, हा तो रस्ता नाही... मी खूप गोंधळलेय. मी आता कुठे जातेय, हे मलाच माहीत नाही... एका दुसऱ्याच कुठल्यातरी हायवेच्या रोडनं मी जातेय... हा खूपच गोंधळून टाकणारा प्रकार आहे. आता टर्मिनल नंबर एकचं काम सुरू करत आहेत आणि बऱ्याचशा फ्लाईट इथे वळवल्या आहेत त्यामुळे प्लीज लवकरात लवकर याबाबत विचार करा..." पुढे त्याच रस्त्यानं प्रवास करताना वंदना गुप्ते यांनी एक एअरपोर्टसाठीचा बोर्ड दाखवला. त्यावर त्या म्हणाल्या की, इतक्या वेळानंतर ह्या रस्त्यावर मला पहिला नवी मुंबई एअरपोर्टसाठीचा बोर्ड दिसतोय. तुम्ही लवकरात लवकर यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना करा..., अशीही विनंती त्यांनी केलीय.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >