Wednesday, September 9, 2026

Minister Gulabrao Patil : 'डीजेच्या आवाजाने एका कानाने ४०% ऐकू येईना !’ गुलाबराव पाटलांची आपबिती; गणेशोत्सवाआधी तरुणांना आवाहन

Minister Gulabrao Patil : 'डीजेच्या आवाजाने एका कानाने ४०% ऐकू येईना !’ गुलाबराव पाटलांची आपबिती; गणेशोत्सवाआधी तरुणांना आवाहन

Minister Gulabrao Patil : डीजेचा दणदणाट हा काहींसाठी उत्सवाचा जल्लोष असतो पण याच आवाजाचा त्रास किती गंभीर असू शकतो, याची आपबिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात डीजे बंदीची मागणी जोर धरत असताना, गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी स्वतःचा अनुभव सांगत तरुणांना यंदा डीजे न लावण्याचं आवाहन केलं आहे.

पुतण्याच्या लग्नात नाचलो पण...

जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, माझ्या पुतण्याचं लग्न होतं. डीजे लावण्यात आलेला होता. मला लोकांनी सांगितलं तुम्ही नाचा आणि मला नाचण्यासाठी ओढलं. त्यामुळे पुतण्याच्या लग्नात नाचलो. पण सप दिशी डीजेचा आवाज माझ्या कानावर आदळला. या डीजेच्या आवाजामुळे मला एका कानाने चाळीस टक्के ऐकू येणे बंद झाले. काहींनी मला कानाला मशीन लावायला सांगितलं. पण बहिरं वाटतं म्हणून मी मशाीन लावली नाही. त्यामुळे येत्या गणेशोत्सात तरुणांनी डीजे नाही लावला तर चांगलं होईल, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. पाटील यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

डीजेमुळे कोणाला होतो त्रास ?

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना त्रास होऊ शकतो. शुगर आणि बीपीचा त्रास असलेल्या व्यक्तींनाही मोठ्या आवाजाचा त्रास होऊ शकतो, असं पाटील यांनी सांगितलं. तसंच मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या प्रखर लेझर लाईटमुळे डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मंत्री मेघना बोर्डिकर (Minister Meghna Bordikar) यांनीही डीजेशी संबंधित गंभीर अनुभव सांगितला आहे. त्यांच्या सख्ख्या चुलत भावाचा डीजेमुळे मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

अनेक जिल्ह्यांत बंदी; पुण्यात मात्र संभ्रम कायम

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये डीजेच्या वापरावर बंदी किंवा निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, पुण्यात डीजे बंदीचा प्रश्न अद्याप कायम आहे. डीजेवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी विद्यानंद बापट यांच्यासह अनेक पुणेकर आंदोलन करत आहेत. सरकारकडून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. मात्र, डीजे बंदीबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट थांबणार का, की पुन्हा एकदा डीजे विरुद्ध पारंपरिक उत्सवाचा वाद रंगणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >