Thursday, September 10, 2026

Gold Theft : ज्वेलरी दुकानातील विश्वासाला तडा! चार वर्षं काम केलं, मग केलं असं काही...दुकानातील कर्मचाऱ्याच्या कृत्याने मालकाला धक्का

Gold Theft : ज्वेलरी दुकानातील विश्वासाला तडा! चार वर्षं काम केलं, मग केलं असं काही...दुकानातील कर्मचाऱ्याच्या कृत्याने मालकाला धक्का

मीरा-भाईंदरमध्ये तब्बल 4 किलो 300 ग्रॅम सोन्याच्या चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका दागिन्यांच्या दुकानातून कोट्यवधी रुपयांचे सोने लंपास करून राजस्थानला पळून गेलेल्या आरोपींचा मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात राजस्थानमधून दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एक आरोपी संबंधित ज्वेलरी दुकानात जवळपास चार वर्षांपासून कर्मचारी म्हणून काम करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

दुकानातील कर्मचाऱ्यानेच केला घात?

पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीची घटना 19 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 ते 4.15च्या दरम्यान घडली. दुकानातून सुमारे 4.3 किलो सोने चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. चोरीच्या सोन्याची किंमत चार कोटी रुपयांहून अधिक असल्याचे वृत्त आहे. तपासादरम्यान पोलिसांनी दुकान आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यासोबतच तांत्रिक तपासाच्या माध्यमातून संशयितांच्या हालचालींचा माग काढण्यात आला. आरोपी राजस्थानहून हरियाणाच्या दिशेने आणि त्यानंतर दिल्लीकडे गेल्याचे तपासात आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.

सीसीटीव्ही (CCTV) आणि तांत्रिक तपासातून आरोपी जाळ्यात

पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि पाळत ठेवण्याच्या माध्यमातून आरोपींचा मागोवा घेतला. त्यानंतर राजस्थानमध्ये विशेष पथक पाठवून कारवाई करण्यात आली आणि दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत चोरीच्या सोन्याव्यतिरिक्त सुमारे ₹5.33 लाख रोकड, दोन मोबाईल फोन आणि अंदाजे ₹8 लाख किमतीची बालेनो (Baleno) कार जप्त केल्याचे वृत्त आहे.

आणखी दोन जण रडारवर

या प्रकरणात एकूण चार संशयितांची भूमिका समोर आली असून, सध्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. चोरीचे सोने नेमके कुठे आणि कोणाकडे पाठवण्यात आले, त्याची विल्हेवाट कशी लावण्यात आली आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, चोरीमागील संपूर्ण कट आणि पैशांचा तसेच सोन्याचा व्यवहार उघड करण्याचा प्रयत्न तपास पथकाकडून केला जात आहे.

या घटनेमुळे दागिन्यांच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी, स्टॉकची नियमित पडताळणी आणि सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >