Thursday, September 10, 2026

Jodi Marathi Movie : ‘जिवा शिवाची बैल जोड...’; महाराष्ट्राच्या मातीत रुजलेलं बळीराजा-बैलांचं अतूट नातं लवकरच पडद्यावर!

Jodi Marathi Movie : ‘जिवा शिवाची बैल जोड...’; महाराष्ट्राच्या मातीत रुजलेलं बळीराजा-बैलांचं अतूट नातं लवकरच पडद्यावर!

मुंबई : 'जिवा शिवाची बैल जोड, लाविल पैजंला आपली कुडं...'चं महत्व सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीत रुजलेलं हे बळीराजा आणि बैलांचं नातं आपण पिढ्यान्‌पिढ्या ऐकत आणि अनुभवत आलो आहोत. शेतकऱ्याच्या कष्टात खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या बैलजोडीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा होणारा पोळा सण याच भावनेने पुन्हा एकदा खास ठरला आहे. कारण पोळ्याच्या मुहूर्तावर एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. (Jodi Marathi Movie)

शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळा, मातीशी जोडलेलं नातं आणि कष्टाच्या वाटेवरची सोबत आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. याच भावनिक नात्याची हृदयस्पर्शी कहाणी घेऊन ‘जोडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘काळाने कितीही घाव घातले, तरी हे नातं तुटत नसतं!’ या टॅगलाइनमधून चित्रपटाच्या कथानकाची भावनिक झलक पाहायला मिळते. पोळ्याच्या निमित्ताने झालेली ‘जोडी’ची घोषणा त्यामुळेच विशेष ठरत असून, या चित्रपटातून शेतकरी आणि बैलजोडीच्या अतूट नात्याची गोष्ट रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. (Jodi Marathi Movie)

चित्रपटाच्या घोषणेसोबत प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरने या कलाकृतीची उत्सुकता वाढवली आहे. पोस्टरमध्ये हिरवाईने नटलेल्या शेतातून बैलजोडी नांगर ओढत पुढे जाताना दिसते. त्याच दृश्याच्या पार्श्वभूमीवर आकाश, शेतजमीन आणि आधुनिक शेतीचं प्रतीक असलेले ट्रॅक्टर दिसत असल्याने बदलत्या काळाची झलकही पोस्टरमधून पाहायला मिळते.

पोस्टरवर 'काळाने कितीही घाव घातले तरी हे नातं तुटत नसतं!' ही ओळ ठळकपणे झळकते. त्यामुळे बदलत्या शेतीपद्धती आणि तंत्रज्ञानाच्या काळातही शेतकरी आणि बैलजोडी यांच्यातील भावनिक नातं अबाधित राहणार असल्याचा आशय यातून सूचित होतो. चित्रपटातून बैलजोडी आणि त्यांच्या मालकाच्या नात्याचा वेगळा, भावस्पर्शी पैलू उलगडण्यात येणार आहे. (Jodi Marathi Movie)

नातं फक्त माणसांमध्येच नसतं, तर ते मातीशी आणि मुक्या जीवांशीही तितकंच घट्ट जोडलेलं असतं. ‘जोडी’च्या पोस्टरमधून याच अतूट नात्याची भावनिक झलक पाहायला मिळते. ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी, शेतीचं जगणं आणि शेतकरी-बैल यांच्यातील जिव्हाळा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. या अनोख्या नात्याची गोष्ट पडद्यावर नेमकी कशी रंगणार, याची उत्सुकता आतापासूनच निर्माण झाली आहे. ज्ञानेश्वर शांताराम जाधव दिग्दर्शित ‘जोडी’ हा चित्रपट ऑगस्ट २०२७मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Jodi Marathi Movie)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >