दिनांक २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत नोंदणीसाठी मुदत
मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईत निर्माण होणाऱ्या बांधकाम आणि पाडकाम राडारोड्याचे व्यवस्थापन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने ‘मुंबई राडारोडा नियंत्रण व मागोवा प्रणाली’ ही सुविधा कार्यान्वित केली आहे. या अंतर्गत, सर्व प्रकल्प तसेच बांधकाम व पाडकाम राडारोडा निर्माण करणारे, प्रक्रिया/पुनर्वापर करणारे किंवा राडारोडा टाकणे/भराव करण्यासाठी अधिकृत स्थळांचा वापर करणारे, संबंधित सर्व घटक तसेच राडारोड्याची वाहतूक करणारे आणि वाहनांची https://mdcts.mcgm.gov.in या संकेतस्थळावर २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच, राडारोडा वाहून नेणाऱ्या वाहनांवर अधिकृत ‘वाहन मागोवा व देखरेख प्रणाली (व्हिटीएमएस)’ लावणे बंधनकारक आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली मुंबईत प्रभावी घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, बांधकाम व पाडकाम राडारोडा व्यवस्थापन नियम, २०२५ आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने ११ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या कार्यपद्धतीनुसार सदर प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
स्थायी समिती अध्यक्षांनी दिले निर्देश, नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी केली मागणी मुंंबई ( विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस ...
या अंतर्गत, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर सूचना प्रकाशित करण्यात आली आहे.
राडारोडा वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनामध्ये महानगरपालिकेने अधिकृत केलेल्या/नियुक्त केलेल्या सेवा प्रदात्यामार्फत पुरविण्यात आलेली व कार्यरत स्थितीतील ‘वाहन मागोवा व देखरेख प्रणाली ’ बसवणे, बांधकाम व पाडकाम राडारोडा केवळ महानगरपालिकेने अधिकृत केलेल्या ठिकाणीच वाहून नेऊन टाकणे/विल्हेवाट लावणे, बांधकाम व पाडकाम राडारोडा वाहतूक करणारी वाहने योग्यरीत्या झाकणे, वाहतुकीदरम्यान राडारोडा सांडणार नाही तसेच धूळ निर्माण होऊन प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेणे अंतर्गत अनिवार्य करण्यात आले आहे.
तथापि, मुंबई महानगरपालिकेच्या ‘मुंबई राडारोडा नियंत्रण व मागोवा प्रणाली ’ वर नोंदणीकृत नसलेल्या तसेच महानगरपालिकेमार्फत नियुक्त केलेल्या सेवा प्रदात्यामार्फत मान्यताप्राप्त व कार्यरत ‘वाहन मागोवा व देखरेख प्रणाली यंत्रणा नसतानाही बांधकाम व पाडकाम राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या वाहनास घनकचरा व्यवस्थापन उपविधी, २०२५ मधील तरतुदींनुसार, प्रति वाहन, प्रति उल्लंघन रु. २५,०००/- इतका दंड आकारण्यात येईल. तसेच, अनधिकृतपणे राडारोडा टाकणे, परवानगीशिवाय राडारोडाची वाहतूक करणे अथवा विल्हेवाट लावणे तसेच इतर लागू नियम, अटी व तरतुदींचे उल्लंघन केल्यास, संबंधित कायदे, उपविधी व नियमांनुसार कार्य स्थगिती देणे, परवानग्या रद्द करणे, बँक हमी जप्त करणे तसेच इतर योग्य ती दंडात्मक/कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत.
अधिक माहितीसाठी तसेच वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांसाठी संबंधितांनी https://mdcts.mcgm.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे.





