पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रथमेश देशमुख असे या तरुणाचे नाव असून तो धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी गावचा रहिवासी होता. पुण्यातील शनिवार पेठ परिसरातील नंदन सोसायटीमध्ये तो मागील काही महिन्यांपासून राहत होता. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. (Pune News )
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी ही परीक्षा आता ...
रात्री खोलीत गेला अन्
प्रथमेश मागील सुमारे 3 वर्षांपासून पुण्यात राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तयारी करत होता. मंगळवारी रात्री तो आपल्या खोलीवर आला होता. मात्र, बुधवारी सकाळी तो खोलीत मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
परिक्षेत वारंवार अपयश आल्याने आत्महत्येचा संशय
प्रथमेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कठीण असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असून आई आणि चार विवाहित बहिणी असा त्याचा परिवार आहे. MPSC परीक्षेत वारंवार आलेले अपयश आणि आर्थिक अडचणींमुळे तो काही काळापासून मानसिक तणावात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
कोणतीही सुसाईट नोट नाही
पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. मात्र, प्रथमेशने लिहिलेल्या दोन पानांवरील आर्थिक नोंदी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यामध्ये काही व्यक्तींकडून घेतलेल्या पैशांचा आणि परत केलेल्या रकमेचा उल्लेख असल्याची माहिती आहे. या नोंदींवरून त्याच्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रथमेश स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यामुळे त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने मित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
अशा प्रकारच्या मानसिक तणावातून जात असलेल्या व्यक्तीने एकट्याने त्याचा सामना न करता विश्वासू व्यक्ती, समुपदेशक किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्यावी.