Thursday, September 10, 2026

Kamathipura Redevelopment : कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाचा नियोजित आराखडा उद्या जाहीर होणार; म्हाडा आणि विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने विशेष सादरीकरण

Kamathipura Redevelopment : कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाचा नियोजित आराखडा उद्या जाहीर होणार; म्हाडा आणि विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने विशेष सादरीकरण

मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा लाभलेल्या कामाठीपुरा परिसराचा चेहरामोहरा बदलणाऱ्या बहुचर्चित 'कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाचा' नियोजित आराखडा अखेर समोर येत आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे आणि कामाठीपुरा विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनचे विशेष सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. उद्या, शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता अखिल पद्मशाली समाज, भावना बाग, कामाठीपुरा, सहावी गल्ली, मुंबई येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. (Kamathipura Redevelopment)

प्रकल्पाची व्याप्ती आणि पार्श्वभूमी

महाराष्ट्र शासनाचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी समूह पुनर्विकास प्रकल्प असून, म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत (MBRRB) DCPR २०३४ मधील विनियम ३३(९) अंतर्गत राबवला जात आहे. यासाठी म्हाडाला 'नोडल एजन्सी' तसेच 'विशेष नियोजन प्राधिकरणाचा' (SPA) दर्जा देण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मे. भागीरथी हाउसिंग प्रा. लि. आणि माथी डेव्हलपर्स प्रा. लि. यांची 'Construction & Development Agency' (C&DA) म्हणून नियुक्ती झाली आहे.

दिग्गज वारसा असलेल्या या परिसरातील जुन्या, जीर्ण व धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करून येथील रहिवाशांना सुरक्षित, आधुनिक आणि सुसज्ज निवासव्यवस्था उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

अंदाजे ३४ एकर क्षेत्र आणि ८ हजारांहून अधिक कुटुंबे प्रभावित

दि. १२ जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार या भागात सेस व नॉन-सेस इमारतींच्या एकात्मिक पुनर्विकासाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

एकूण क्षेत्र: सुमारे ३४ एकर

इमारतींची संख्या: सुमारे ९४३ उपकरप्राप्त (सेस) आणि ३४९ नॉन-सेस इमारती

एकूण हितसंबधित घटक: ८,००० हून अधिक रहिवासी व भाडेकरू

घटकनिहाय आकडेवारी: सुमारे ६,६२५ निवासी भाडेकरू, १,३७६ व्यावसायिक भाडेकरू आणि सुमारे ८०० जमीनमालक या प्रक्रियेशी जोडलेले आहेत.

सादरीकरणाचा मुख्य उद्देश

कामाठीपुरा विकास समितीच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात प्रकल्पाची संपूर्ण संकल्पना, व्याप्ती, पुनर्वसनाचे नियोजन, नागरिकांना मिळणाऱ्या नागरी व पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक उपाययोजना आणि भविष्यातील विकासाचा आराखडा मांडला जाणार आहे.

स्थानिक नागरिक, भाडेकरू, जमीनमालक आणि सर्व संबंधित घटकांना हा नियोजित आराखडा थेट समजून घेता यावा, तसेच त्यांच्या सक्रिय सहभागातून पुनर्विकासाची ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करता यावी, यासाठी या विशेष सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. (Kamathipura Redevelopment)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >