Friday, September 11, 2026

Mumbai Accident News : शिवडी वर्कशॉपमध्ये भीषण अपघात; SUVच्या धडकेत ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू

Mumbai Accident News : शिवडी वर्कशॉपमध्ये भीषण अपघात; SUVच्या धडकेत ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू

मुंबई : शिवडीतील ‘कोलगेट जेटी’ परिसरातील एका ऑटोमोबाईल वर्कशॉपमध्ये एसयूव्हीच्या धडकेत ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. सकाळी साडेअकराच्या सुमारास वर्कशॉपच्या वॉशिंग एरियाजवळ साजिद अली शेख हे भिंतीलगत बसले असताना १७ वर्षीय मुलाने चालवलेली ‘XUV700’ अचानक पुढे सरकली आणि साजिद यांना धडकली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. (Mumbai Accident News)

या घटनेनंतर वर्कशॉपमध्ये अल्पवयीन मुलाला कामावर ठेवण्याबाबत आणि त्याच्याकडून वाहन चालवण्याचे काम करून घेण्याबाबत, गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पोलिसांनी कंत्राटदार मोहम्मद गुड्डू खान याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. एफआयआरमध्ये सर्व्हिस कर्मचारी मनोज वसंत शिवरीकर (५६) आणि वॉशिंग-साइट सुपरवायझर जफर शेख यांचीही नावे आहेत.

पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील कलम १०६(१) तसेच बाल व किशोर कामगार (प्रतिबंध व नियमन) कायद्यातील कलम १४ अंतर्गत कारवाई केली आहे. गुड्डू खान याच्याकडे महिंद्रा वाहनांच्या धुण्याचे कंत्राट होते, तर मनोज शिवरीकर हे सर्व्हिस कर्मचारी आणि जफर शेख हे वॉशिंग-साइट सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. वडाळा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याच्या तपासाच्या टप्प्यावर या घटनेप्रकरणी अल्पवयीन मुलावर स्वतंत्र फौजदारी खटला चालवण्याची शक्यता दिसत नाही. दरम्यान, अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला आणि वर्कशॉपमध्ये अल्पवयीन मुलाकडून वाहन चालवून घेतले जात होते का, याचा पोलीस तपास सुरू आहे.

शिवडीचे रहिवासी आणि साजिदचे दूरचे नातेवाईक शेख मोहम्मद अमीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद '3M' कंपनीमार्फत वाहने धुण्याचे आणि आतील भाग स्वच्छ करण्याचे काम गेल्या १३-१४ वर्षांपासून करत होता. त्याला 'महिंद्रा अँड महिंद्रा'च्या केंद्रावर कामासाठी नेमण्यात आले होते. तो महिन्याला सुमारे १६ ते १८ हजार रुपये कमवत असे, असे अमीर यांनी सांगितले. (Mumbai Accident News)

वकिलांचे म्हणणे काय?

"यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकावर कारवाई जाली पाहिजे आणि त्यांनी कुटुंबाला नुकसानभरपाई दिली पाहिजे. तिथे एक अल्पवयीन मुलगा काम करत होता आणि त्याला वाहन हाताळण्याची मुभा देण्यात आली होती. यात सहभागी असलेल्या सर्वांच्या जबाबदारीची तपासणी होणे गरजेचे आहे" असे कुरेशी म्हणाले. कामगारांच्या नेमणुकीत सहभागी असलेल्या कंपन्यांच्या जबाबदारीबाबतही कुटुंबाने प्रश्न उपस्थित केले आहेत.

कुटुंबाला शोक अनावर

"त्याचे लग्न होऊन साधारण दोन-तीन वर्षे झाली होती आणि त्याला व त्याच्या पत्नीला मूल होण्याची आशा होती. साजिद हा कुटुंबाचा मुख्य कमावता सदस्य होता आणि तो आपल्या पत्नीचा व वृद्ध पालकांचा सांभाळ करत होता." असे अमीर यांनी सांगितले. साजिद अत्यंत गरीब कुटुंबातील होता आणि फुटपाथवरील घरात राहत होता. कुटुंबाला नुकसानभरपाई मिळायला हवी, असे ते म्हणाले.

साजिदच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, वॉशिंगचे कंत्राट असलेल्या मोहम्मद गुड्डू खान याने त्या मुलाला कामावर घेण्यापूर्वी त्याचे वय तपासले नाही. पीडित कुटुंबाचे वकील फहाद अली कुरेशी यांनी सांगितले की, त्या कामगाराची नेमणूक आणि देखरेख यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाच्या भूमिकेची तपासणी केली पाहिजे. (Mumbai Accident News)

वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पडवे यांनी सांगितले की, ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने आरोपींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. "आम्ही आरोपींना नोटिसा बजावल्या आहेत कारण या प्रकरणात लावण्यात आलेल्या कलमांनुसार सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. (Mumbai Accident News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >