महाराष्ट्र मंडळाकडून ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मान
लंडन : जगभरातील मराठी बांधव, उद्योजक आणि मराठी संस्कृतीला एका जागतिक व्यासपीठावर आणण्यासाठी पुढील ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ लंडनमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लंडनमधील ऐतिहासिक महाराष्ट्र मंडळाच्या वतीने शिंदे यांना ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला. (Eknath Shinde)
महाराष्ट्र भवनात झालेल्या या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि मराठी परंपरेनुसार शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लंडनमधील मराठी बांधवांना शुभेच्छा देत “आपली संस्कृती आणि आपला ठसा उमटवला पाहिजे,” असे आवाहन केले.
जगभरातील मराठी भाषकांसाठी मध्यवर्ती संस्था
यावेळी आपल्या भावपूर्ण सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेला तरी आपली माती, भाषा आणि संस्कृती विसरत नाही. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार करण्यासाठी लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याची घोषणा केली. जगभरातील मराठी भाषकांना एकत्र जोडण्यासाठी मध्यवर्ती संस्था स्थापन करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (Eknath Shinde)
- उच्च न्यायालय; राज्य सरकारला आवश्यक वैद्यकीय सहाय्य करण्याचे निर्देश मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना मुंबईत आंदोलन करायचे ...
मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आल्याचा उल्लेख करत शिंदे यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरांच्या संवर्धनावर भर दिला. ज्येष्ठ कवी सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ या ओळींचा उल्लेख करत त्यांनी मराठी अस्मिता जपण्याचे आवाहन केले.(Eknath Shinde)
लंडनमधील महाराष्ट्र मंडळाने मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्याचे काम पुढेही सुरू ठेवावे. “तुमच्या पाठीशी सरकार आहे आणि एकनाथ शिंदेही खंबीरपणे उभा राहील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘सरकार विकासाच्या ब्रेकवर नाही, ॲक्सिलेटरवर’
महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले असून मुंबई-एमएमआरमध्ये विकासाला गती दिल्यास मोठी आर्थिक क्षमता निर्माण होऊ शकते, असे शिंदे यांनी सांगितले. “सरकार विकासाच्या ब्रेकवर नाही, तर ॲक्सिलेटरवर आहे,” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासात महाराष्ट्राचा मोठा वाटा असावा, ही राज्य सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव, दहीहंडी यांसारखे सण-उत्सव पुन्हा उत्साहात साजरे करण्यास सुरुवात केल्याचा उल्लेख करत, लंडनमध्ये राहूनही मराठी बांधव आपले सण आणि परंपरा जपत आहेत, मग महाराष्ट्रात ते बंद करून कसे चालेल, असा सवालही त्यांनी केला. (Eknath Shinde)
मुंबई: लालबाग येथील एका कार्यक्रमादरम्यानचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात नवीन वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र गीत सुरू असताना आदित्य ...
महाराष्ट्र ‘ग्रोथ इंजिन’, पायाभूत सुविधांवर भर
अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे मिसिंग लिंक टनेल आणि वाढवण बंदरासाठी ७६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक यांचा उल्लेख करत महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ आणि ‘पॉवर हाऊस’ बनत असल्याचे शिंदे म्हणाले. महाराष्ट्र १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Eknath Shinde)
समृद्धी महामार्गासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला देताना करार केल्यानंतर काही तासांतच आरटीजीएसद्वारे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. सरकार आणि जनतेतील विश्वासामुळे जमीन संपादनाची प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण होण्यास मदत झाली, असे ते म्हणाले.
आंबेडकर, टिळक, सावरकरांच्या लंडनशी आठवणी
लंडनचा महाराष्ट्राशी ऐतिहासिक संबंध असल्याचे सांगताना शिंदे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लंडनमधील वास्तव्याचा उल्लेख केला. बाबासाहेब आंबेडकर ज्या वास्तूत राहिले होते, त्या ठिकाणाचे महाराष्ट्र सरकारने स्मारकात रूपांतर केल्याचे त्यांनी सांगितले. (Eknath Shinde)
“लंडनमधील बाबासाहेबांच्या वास्तव्याच्या ठिकाणी नतमस्तक होण्याचे भाग्य मला लाभले. त्यांनी लिहिलेल्या अद्वितीय संविधानामुळेच माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता राज्याच्या सर्वोच्च पदावर सेवा करू शकत आहे,” अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली.
Nashik : मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण अर्थात एसआरआर मोहिमेत नाशिक जिल्ह्यात तब्बल १० लाख २७ हजार ८९४ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली ...
कार्यक्रमाला निवृत्त सनदी अधिकारी भूषण गगराणी, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, महाराष्ट्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. गोविंद कानेगावकर, अध्यक्ष वृषाल खांडके, मराठी भाषा संचालक श्यामकांत देवरे, मराठी चित्रपट निर्माते-अभिनेते मंगेश देसाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
“महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्राची प्रगती हाच आमचा अजेंडा आहे,” असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. (Eknath Shinde)





