Friday, September 11, 2026

Mumbai Crime : 4 जणांनी विमानातून आणले कोट्यवधींचे सोने, पण एक चूक अन्... मुंबई विमानतळावर कस्टमची सर्वात मोठी कारवाई!

Mumbai Crime : 4 जणांनी विमानातून आणले कोट्यवधींचे सोने, पण एक चूक अन्... मुंबई विमानतळावर कस्टमची सर्वात मोठी कारवाई!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विदेशी सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत DRI अधिकाऱ्यांनी 3.47 किलो सोन्याची धूळ जप्त केली असून तिची अंदाजे किंमत 5.47 कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात 2 ट्रान्झिट प्रवासी आणि 2 एअरलाइन कर्मचाऱ्यांसह एकूण 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावर सोन्याची मोठी तस्करी उघड

DRI अधिकाऱ्यांना विमानतळावरून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी विमानतळावर तसेच त्याबाहेरील परिसरात पाळत ठेवली. याचदरम्यान एका एअरलाइन कर्मचाऱ्याचा विमानतळाबाहेर पडताना सुमारे 50 किलोमीटरपर्यंत पाठलाग करण्यात आला. त्यानंतर त्याला पकडून झडती घेतली असता त्याच्याकडून मेणाच्या स्वरूपातील सोन्याची धूळ असलेल्या 3 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या.

चौकशीदरम्यान या कर्मचाऱ्याने धक्कादायक माहिती दिली. ट्रान्झिट एरियामध्ये एका प्रवाशाने त्याच्याकडे हे सोने दिले होते आणि ते विमानतळाबाहेर नेण्यासाठी एअरलाइनमधील एका महिला कर्मचाऱ्याची मदत घेतली जात असल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर DRI अधिकाऱ्यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्यालाही एअरलाइनच्या काउंटरजवळ ताब्यात घेतलं.

चौकशीत आणखी 2 ट्रान्झिट प्रवाशांचा या तस्करीत सहभाग असल्याचं समोर आलं. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी विमानतळावर गुप्त पाळत ठेवली. हे दोन्ही भारतीय प्रवासी मस्कत आणि दुबईहून आले होते. ते एअरलाइन कर्मचाऱ्याला तस्करीचं सोने देत असताना DRI अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं.

त्यानंतर या संपूर्ण नेटवर्कशी संबंधित सूत्रधारालाही ताब्यात घेण्यात आलं. सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत मेणाच्या स्वरूपातील सोन्याची धूळ असलेल्या एकूण 8 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. या सोन्याची किंमत सुमारे 5.47 कोटी रुपये आहे.

विमानतळावरून होणाऱ्या विदेशी सोन्याच्या तस्करीविरोधात DRI मुंबई विभागीय युनिटकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातून विमानतळावरील तस्करीच्या नेटवर्कमध्ये प्रवाशांसोबतच एअरलाइन कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचंही समोर आलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा