
मुंबई: जिओ प्लॅटफॉर्म्सने शेअर बाजारात धमाकेदार एंट्री केली असून, गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. जिओचा शेअर आज एनएसईवर 1,358 रुपयांवर लिस्ट झाला. याची इश्यू प्राइज 1,119 रुपये होती. या ऐतिहासिक यशानंतर अंबानी कुटुंबीयांनी मुंबईच्या श्री सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि कृतज्ञता व्यक्त केली. रिलायन्स समूहाच्या या नव्या भरारीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
सिद्धीविनायकाच्या दरबारात अंबानी कुटुंबाची उपस्थिती
यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी, पुत्र आकाश अंबानी आणि अनंत अंबानी उपस्थित होते. सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि पुजाऱ्यांकडून त्यांना शाल आणि बाप्पाची सुंदर मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. या प्रसंगी अंबानी कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद आणि मोठा उत्साह स्पष्ट दिसत होती. अंबानी कुटुंबाची सिद्धीविनायक मंदिराला भेट देण्याची परंपरा जुनी आहे. कुटुंबातील कोणताही मोठा कार्यक्रम, वाढदिवस किंवा कंपनीचा मोठा टप्पा असला की अंबानी कुटुंबीय बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आवर्जून उपस्थित राहत असतात.
मुंबई : भारतीय शेअर बाजारात बुधवारी एका नव्या आणि ऐतिहासिक अध्यायाची सुरुवात झाली. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या (Jio Platforms) शेअर बाजारातील धमाकेदार पदार्पणामुळे ...
२१ टक्के प्रीमियमवर शानदार लिस्टिंग आणि अवाढव्य मार्केट कॅप
आज सकाळी जिओ प्लॅटफॉर्म्सचा शेअर बीएसई आणि एनएसई वर 1,358 रुपयांवर लिस्ट झाला. हा आयपीओच्या 1,119 रुपये या किंमतीपेक्षा 21.36% जास्त आहे. लिस्टिंगनंतर काही मिनिटांतच कंपनीचे मार्केट व्हॅल्युएशन 12.50 लाख कोटी रुपये झाले. यामुळे जिओने भारती एअरटेलला मागे टाकले आहे. या शानदार लिस्टिंगमुळे रिलायन्स ग्रुपचे एकूण मार्केट कॅप 30 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. जिओचा 30,213 कोटींचा आयपीओ तब्बल 22.19 पट सबस्क्राइब झाला होता, ज्यावरून या कंपनीच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.





