Nashik Ashram School News : आश्रमशाळांमधील सुविधांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दिंडोरी तालुक्यातील जोपूळ येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेला अचानक भेट दिली. शाळेतील किचनची दुरवस्था आणि विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी कॉटची सुविधा नसल्याचे समोर आल्यानंतर मंत्री उईके यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना शाळेची मान्यता रद्द करण्याच्या तोंडी सूचना दिल्या असून विद्यार्थ्यांना अन्य शाळेत समायोजित करण्याचे निर्देश दिले.
आश्रमशाळेची दुरवस्था पाहून मंत्री संतप्त
मंत्री उईके हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी बोपेगाव आणि माणी येथील आश्रमशाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. यानंतर गुरुवारी सायंकाळी त्यांनी जोपूळ आश्रमशाळेची अचानक पाहणी केली. यावेळी शाळेतील किचनची अवस्था अत्यंत खराब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी कॉट उपलब्ध नसल्याने ते जमिनीवर झोपत असल्याची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीत ठेवणे योग्य नसल्याचे सांगत मंत्री उईके यांनी शाळेच्या अधीक्षकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला. विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि शाळेची मान्यता रद्द करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
Nashik Crime News : नाशिकच्या गंगापूर रोडवर रात्रीच्या अंधारात दुभाजकावरील झाडांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जाहिरात फलक स्पष्ट दिसावा ...
विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाचीही पार्श्वभूमी
दरम्यान, याच आश्रमशाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने ऑगस्ट महिन्यात आत्महत्या केली होती. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून मुख्याध्यापक, अधीक्षकांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आदिवासी संघटनेच्या वतीने प्रभाकर फसाळे आणि विकी मुंजे यांनी विद्यार्थ्याच्या मृतदेहाची हेळसांड झाल्याचा आरोप केला. याबाबतची माहितीही त्यांनी मंत्री उईके यांना दिली.
यावेळी प्रभारी आदिवासी विकास आयुक्त गोपिचंद कदम, अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प संचालक अर्पिता ठुबे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. आता मंत्री उईके यांच्या सूचनांनंतर जोपूळ आश्रमशाळेबाबत प्रशासनाकडून पुढील कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे