Friday, September 18, 2026

Surinder koli suicide : २००६ च्या बहुचर्चित निठारी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरिंदर कोळीची आत्महत्या; हरिद्वारमधील चहाच्या टपरीवर गळफास

Surinder koli suicide : २००६ च्या बहुचर्चित निठारी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरिंदर कोळीची आत्महत्या; हरिद्वारमधील चहाच्या टपरीवर गळफास

हरिद्वार : २००६ मधील नोएडा येथील बहुचर्चित आणि थरारक निठारी नरसंहार प्रकरणातील मुख्य आरोपी सुरिंदर कोळी याने शुक्रवारी (१८ सप्टेंबर २०२६) उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गळफास लावून आत्महत्या केली. सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२५ मध्ये सर्व प्रकरणांतून निर्दोष मुक्तता केल्यानंतर कोळी जवळपास १९ वर्षांनंतर तुरुंगाबाहेर आला होता. गेल्या काही दिवसांपासून तो हरिद्वारमधील एका चहाच्या टपरीवर काम करत होता, त्याच ठिकाणी त्याचा मृतदेह आढळून आला.

घटना कशी उघडकीस आली ?

माहितीनुसार, हरिद्वारमधील भूपतवाला भागातील सप्त सरोवर रस्त्यावर असलेल्या लालमाता मंदिरासमोरील एका चहाच्या टपरीवर सुरिंदर कोळीचा मृतदेह दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेची माहिती मिळताच सप्तर्षी चौकीच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळ सापडलेल्या [Aadhaar Redacted] वरून त्याची ओळख पटवण्यात आली, ज्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना याबद्दल माहिती दिली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

सुरिंदर कोळी याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र आत्महत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणातील सर्व संभाव्य कोनांचा विचार करून तपास करत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम प्रकरणात निर्दोष मुक्तता

निठारी हत्याकांडातील विविध खटल्यांमुळे सुरिंदर कोळीला तब्बल १९ वर्षे तुरुंगात राहावे लागले होते. ऑक्टोबर २०२३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने १२ प्रकरणांमध्ये त्याची निर्दोष मुक्तता केली होती. तपासातील गंभीर त्रुटी आणि पुराव्यांवरील संशय लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला होता. जुलै २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही या मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळून लावल्या होत्या. तरीही, रिम्पा हलदर या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात शिक्षा झाल्यामुळे कोळी तुरुंगातच होता. दया याचिकेवर निर्णय होण्यास झालेला विलंब विचारात घेऊन २०१५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. त्यानंतर, नोव्हेंबर २०२५ मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश बी. आर. गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने कोळीची पुनर्विलोकन याचिका (Curative Petition) मंजूर करत त्याची अंतिम खटल्यातूनही निर्दोष मुक्तता केली. पोलिसांनी घेतलेला जबाब आणि सादर केलेले पुरावे शिक्षेसाठी पुरेसे नाहीत, असा निष्कर्ष काढत जर तो इतर कोणत्याही गुन्ह्यात हवा नसेल तर त्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तपासातील त्रुटींवर बोट ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, कोळीला दीर्घकाळ पोलीस कोठडीत ठेवणे, त्याचा कबुलीजबाब नोंदवण्याची पद्धत आणि गुन्ह्याशी त्याचा थेट संबंध जोडणाऱ्या पुराव्यांचा अभाव या गंभीर बाबी आहेत. केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही, तर पुराव्याची साखळी सिद्ध होणे आवश्यक असते, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

निठारी हत्याकांडाची पार्श्वभूमी

२९ डिसेंबर २००६ रोजी नोएडामधील निठारी येथील मोंदिर सिंग पंढेर याच्या घरामागच्या नाल्यात मुलांचे सांगाडे सापडल्यानंतर हे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले होते. त्यानंतर झालेल्या तपासात आणखी अवशेष सापडले आणि एकूण १९ पीडितांच्या प्रकरणात १९ एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले. डिसेंबर २००६ मध्येच कोळी आणि पंढेर यांना अटक करण्यात आली होती, ज्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नोव्हेंबर २०२५ मध्ये कोळी तुरुंगाबाहेर आला होता. मात्र, सुटकेनंतर वर्षभरही पूर्ण न होताच हरिद्वारमध्ये त्याच्या आत्महत्येची बातमी आल्याने या देशातील सर्वात मोठ्या गुन्हेगारी प्रकरणांपैकी एका खटल्याचा असा अनपेक्षित अंत झाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >