Sunday, September 20, 2026

Ramesh Pawar : मनात कलेचा ध्यास, हातात सर्जनशीलता अन् हृदयात श्रद्धा; रमेश पवारांच्या घरात साकारलं त्र्यंबकेश्वर मंदिर!

Ramesh Pawar : मनात कलेचा ध्यास, हातात सर्जनशीलता अन् हृदयात श्रद्धा; रमेश पवारांच्या घरात साकारलं त्र्यंबकेश्वर मंदिर!

नाशिक : परिस्थिती कितीही साधी असली, तरी मनात काहीतरी करण्याची जिद्द आणि नवी कल्पना साकारण्याची इच्छा असेल, तर व्यक्ती स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करू शकते. नाशिकमधील रमेश पवार यांचा प्रवास याचीच प्रचिती देतो. (Ramesh Pawar)

मूळचे सटाणा येथील रहिवासी असलेले रमेश पवार काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये दाखल झाले. सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी, हाताशी असलेली मर्यादित साधनं आणि नव्या शहरात स्वतःचं आयुष्य उभं करण्याचं आव्हान अशा परिस्थितीतही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. नाशिकमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी ‘पांडव कलर लॅब’ या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर एका कंपनीत नोकरीही स्वीकारली. आयुष्यात अनेक बदल झाले, मात्र त्यांची मेहनत, चिकाटी आणि कलेची आवड कायम राहिली. (Ramesh Pawar)

दिवसभराच्या कामकाजानंतर उरलेला वेळ त्यांनी आपल्या छंदासाठी राखून ठेवला. ‘टाकाऊतून टिकाऊ’ या विचारातून घरातील वापरात नसलेल्या वस्तूंना कल्पकतेने नवं स्वरूप देण्यास त्यांनी सुरुवात केली. साध्या आणि निरुपयोगी वस्तूंचा उपयोग करून त्यांनी वेगवेगळ्या आकर्षक कलाकृती तयार केल्या. एवढंच नव्हे, तर भारतीय हवाई दलातील मिग-29 या लढाऊ विमानाची हुबेहूब प्रतिकृतीही त्यांनी घरच्या घरी साकारली. त्यांच्या या कलाकौशल्याचं अनेकांकडून कौतुक करण्यात आलं.(Ramesh Pawar)

यंदाच्या गणेशोत्सवात त्यांच्या या कलेला भक्तीची जोड मिळाली. लाडक्या गणरायाचं स्वागत काहीतरी वेगळ्या पद्धतीने करण्याच्या उद्देशाने त्यांनी घरातच श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराचा सुंदर देखावा उभारला. मंदिराची रचना, त्यातील बारकावे आणि एकूण स्वरूप उठावदार दिसावं यासाठी त्यांनी अनेक दिवस परिश्रम घेतले. त्यांच्या मेहनतीतून साकारलेला हा देखावा पाहिल्यानंतर जणू त्र्यंबकेश्वरच आपल्या घरात अवतरल्याची अनुभूती येते.

पवार कुटुंबीयांच्या घरातील हा देखावा आता केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर परिसरातील नागरिकांसाठीही तो आकर्षणाचा विषय ठरला आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण हा देखावा पाहण्यासाठी आवर्जून त्यांच्या घरी येत आहेत.(Ramesh Pawar)

सटाण्यातील सर्वसामान्य कुटुंबातून नाशिकमध्ये आलेले रमेश पवार… स्वतःच्या कष्टाने संसार उभा करताना नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात, त्याचवेळी आपल्या मनातील कलाकारालाही त्यांनी जपलं आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरतो.

साधनं कमी असली तरी कल्पकता मोठी असते आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द असेल तर वेगळं काहीतरी साकारता येतं, हे रमेश पवार यांनी आपल्या कलेतून सिद्ध केलं आहे. त्यांच्या या मेहनतीला आणि कलेला ‘प्रहार’ टीमचा सलाम! (Ramesh Pawar)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >