Sunday, September 20, 2026

Indian Air Force : भारत-जपान हवाई दलांचा ‘वीर गार्डियन-2026’ सराव; दोन्ही हवाई दल प्रमुख एकत्र उडणार तेजस

Indian Air Force : भारत-जपान हवाई दलांचा ‘वीर गार्डियन-2026’ सराव; दोन्ही हवाई दल प्रमुख एकत्र उडणार तेजस

जोधपूर : राजस्थानमधील जोधपूर हवाई तळावर भारत आणि जपानच्या हवाई दलांमध्ये ‘वीर गार्डियन-2026’ हा संयुक्त सराव सुरू आहे. रविवारी या सरावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आणि जपानच्या हवाई दलाचे प्रमुख जनरल ताकेहिरो मोरिता यांनी जोधपूर हवाई तळाला भेट दिली.

दोन्ही अधिकाऱ्यांनी सरावात सहभागी झालेल्या भारतीय आणि जपानी हवाई दलाच्या जवानांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांच्या पथकांसोबत त्यांनी समूह छायाचित्रही काढले. त्यानंतर दोन्ही हवाई दल प्रमुख संयुक्तपणे उड्डाण करणार आहेत. या उड्डाणाकडे भारत आणि जपानमधील संरक्षण सहकार्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोडी म्हणून पाहिले जात आहे.

या संयुक्त उड्डाणात भारतीय हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग हे स्वदेशी तेजस लढाऊ विमानाचे नेतृत्व करणार आहेत. तर जपानचे हवाई दल प्रमुख जनरल ताकेहिरो मोरिता हे तेजसच्या प्रशिक्षक विमानातून उड्डाण करतील. त्यांच्या विमानाचे नियंत्रण भारतीय वैमानिकाकडे असेल.

‘वीर गार्डियन-2026’ हा 14 दिवसांचा सराव असून तो 22 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या सरावात भारताकडून तेजस, राफेल आणि सुखोई-30MKI या लढाऊ विमानांचा सहभाग आहे. तर जपानकडून F-2A विमानांचा सहभाग आहे. दोन्ही देशांचे हवाई दल विविध हवाई मोहिमांचा सराव करत आहेत.

या सरावाचा उद्देश केवळ हवाई कसरती करणे एवढाच नाही. मोहिमांचे नियोजन, त्यांची अंमलबजावणी आणि हवाई डावपेच याबाबत दोन्ही देशांचे वैमानिक आणि तज्ज्ञ एकमेकांसोबत अनुभवांची देवाणघेवाण करत आहेत. विमान अभियांत्रिकी आणि हवाई सुरक्षेसारख्या विषयांवरही चर्चा होत आहे.

या संयुक्त सरावामुळे भारत आणि जपानच्या हवाई दलांमध्ये समन्वय वाढण्यास तसेच एकत्रितपणे काम करण्याची क्षमता मजबूत होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >