Wednesday, November 4, 2026

Ramdas Athawale: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं राहुल गांधींवर टीकास्त्र

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्याकडून सतत पंतप्रधान मोदींवर केल्या जाणाऱ्या टीकेचाही आठवले यांनी खरपूस समाचार घेतला.

केंद्र सरकारमधील घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला आहे. लोकशाहीत आंदोलनाचे स्थान मान्य करतानाच, केवळ आंदोलनांच्या जोरावर सत्ता बदलता येत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांना जनतेच्या जनादेशाचा आदर करण्याचा सल्ला दिला आहे. रामदास आठवले यांनी स्पष्ट केले की, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून येथे प्रत्येकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन आणि विरोध नोंदवण्याचा वैधानिक अधिकार आहे. मात्र, जनभावनेचा आणि निवडणुकांचा कौल डावलून केवळ आंदोलन उभारून सरकार खाली खेचता येत नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत भारतीय जनता पक्ष आणि एनडीए सरकारला पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या धोरणांवर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना सत्तेवर बसवले आहे.

राहुल गांधी यांच्याकडून सतत पंतप्रधान मोदींवर केल्या जाणाऱ्या टीकेचाही आठवले यांनी खरपूस समाचार घेतला. विरोधकांच्या प्रत्येक रास्त आणि महत्त्वाच्या मागणीवर चर्चा करण्यास केंद्र सरकार पूर्णपणे तयार आहे, असे सांगताना आठवले म्हणाले की, सरकारचा एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून ते स्वतःही विरोधकांशी कोणत्याही मुद्द्यावर संवाद साधण्यास उत्सुक आहेत. विरोधकांनी टीकेचे राजकारण सोडून रचनात्मक भूमिकेत यावे, कारण एनडीए सरकारचा एकमेव आणि मुख्य अजेंडा म्हणजे देशाचा सर्वांगीण 'विकास' हाच आहे. विरोधकांकडून सातत्याने होणारे मतचोरीचे आरोप आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (EVM) विश्वसनीयतेवर उपस्थित केले जाणारे प्रश्न यावर बोलताना आठवले यांनी वस्तुस्थिती मांडली. मतदार याद्यांमधील त्रुटी, दुबार नावे आणि तांत्रिक चुका दूर करण्यासाठीच 'एसआयआर' (SIR) प्रक्रिया राबवली जात असून ती प्रशासकीय सुधारणेचा एक भाग आहे.

ईव्हीएम मशीनबाबत बोलताना आठवले यांनी विरोधकांना आव्हान दिले. विरोधकांनी केवळ हवेत आरोप न करता ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार किंवा ते खराब असल्याचे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करून दाखवावे. जर विरोधकांना अजूनही शंका असेल, तर बॅलेट पेपरवर निवडणुका लढवण्यासही एनडीएची पूर्ण तयारी आहे, असे त्यांनी ठासून सांगितले. राजकीय इतिहासाची आठवण करून देताना आठवले म्हणाले की, देशात ईव्हीएमचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला नसून, तो काँग्रेसचेच माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या कार्यकाळात आणला गेला होता. मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता, जलद मोजणी आणि सर्वांच्या सोयीसाठीच ईव्हीएमचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे, असेही आठवले यांनी शेवटी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >