मुंबई : भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एका कारला मुंबईतील फ्रीवेवर सोमवारी अपघात झाला. दरेकर यांचा ताफा फ्रीवेवरून जात असताना ताफ्यातील कार आणि टॅक्सीची धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असून दरेकर सुखरूप असल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच दरेकर यांनी स्वतः वाहनातून खाली उतरून घटनास्थळी पाहणी केली. त्यांच्यासोबत खासगी सुरक्षा कर्मचारीही होते. अपघाताची तीव्रता कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, गणेशोत्सवामुळे मुंबईतील रस्त्यांवर सध्या मोठी वर्दळ आहे. विविध गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी राजकीय नेत्यांचीही ये-जा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर दरेकर यांचा ताफा फ्रीवेवरून जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर काही काळ घटनास्थळी वाहनांची गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.