सिंधुदुर्ग : राज्यातील काही भागात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित तलाव, जलाशय व इतर जलसाठ्यांची पाहणी करून संभाव्य नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. सिधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातून राज्यातील सर्व सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्याशी ऑनलाइन बैठक घेत त्यांनी हा आढावा घेतला.(Nitesh Rane fishermen relief)
ऑनलाइन बैठकीतील ठळक मुद्दे व निर्देश
मत्स्य आयुक्तांची उपस्थिती: या उच्चस्तरीय बैठकीस मंत्रालय, मुंबई येथून मत्स्य आयुक्त भानुदास पालवे तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आपापल्या जिल्ह्यातून ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.
सविस्तर माहिती संकलनाचे आदेश: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार, मत्स्यव्यवसाय विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व तलाव, जलाशय व मत्स्यशेतीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ माहिती गोळा करावी, असे मंत्री राणे यांनी बजावले.
प्रत्येक जलाशयाची पाहणी: प्रत्येक जिल्ह्यातील सहायक आयुक्तांनी संबंधित तलाव व जलाशयांना प्रत्यक्ष भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घ्यावा. तसेच स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधून दुष्काळसदृश्य परिस्थितीचा त्यांच्या व्यवसायावर होणारा परिणाम समजून घ्यावा.(Nitesh Rane fishermen relief)
जिल्हानिहाय आकडेवारी: प्रत्येक जिल्ह्यातील एकूण तलावांची संख्या, सद्यस्थितीतील पाणीसाठा, संभाव्य बाधित तलाव आणि प्रभावित होणारे तालुके यांची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मच्छिमारांना हवी आवश्यक मदत
मत्स्यशेतीला कृषीचा दर्जा प्राप्त झाला असून शेतीच्या नुकसानीप्रमाणेच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या बाधित मच्छिमारांनाही शासनाकडून आवश्यक मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व संभाव्य बाधित मच्छिमारांची अचूक माहिती संकलित करून ती तात्काळ जिल्हा प्रशासनास सादर करावी, असे स्पष्ट निर्देश मंत्री राणे यांनी दिले. माहिती संकलन व प्रत्यक्ष पाहणी करताना अधिकाऱ्यांनी संबंधित मच्छिमारांशी अत्यंत संवेदनशीलतेने संवाद साधावा आणि शासनाकडून त्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचा दिलासा द्यावा, असे त्यांनी नमूद केले.
स्वतः पाहणी करणार
राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आपण स्वतः विविध भागांचा दौरा करणार असून बाधित मच्छिमारांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिली. (Nitesh Rane fishermen relief)