मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आश्रय योजनेतील लाभार्थ्यांच्या चावी वाटप कार्यक्रमातून डावलल्याने शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने देवरांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. भविष्यात शासकीय कार्यक्रमांमध्ये शिष्टाचाराचे पालन करून स्थानिक लोकप्रतिनिधींचा सन्मान राखावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चावी वाटप
मुंबई महापालिकेकडून शुक्रवारी कुलाबा येथे आश्रय योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, पालिकेतील गटनेते आणि अधिकारी उपस्थित होते. मात्र, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे दोनवेळा माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार असलेल्या मिलिंद देवरा यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. यामुळे देवरांनी आश्चर्य व्यक्त केले.
मुंबई: पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेनेही प्रवाशांसंबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सण आणि छट पूजेनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ...
आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र; शिष्टाचार पाळण्याची अपेक्षा
या प्रकरणी खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. विकास प्रकल्पांच्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा मानसन्मान राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. भविष्यात मुंबई महापालिकेकडून आयोजित शासकीय कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींना योग्य निमंत्रण आणि सन्मान दिला जाईल, अशी अपेक्षा खासदार देवरांनी व्यक्त केली आहे. या पत्रामुळे कुलाब्यातील कार्यक्रमातून खासदारांना डावलल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.