तुर्भे : तुर्भे एमआयडीसी परिसरात वाढदिवस साजरा करताना तलवारीसारख्या शस्त्राने केक कापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी तिघांविरोधात तुर्भे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्राचा वापर केल्याचा आरोप या तरुणांवर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून दखल घेत कारवाई केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 10 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली. अजित मुन्ना सरोज (20) याचा वाढदिवस असल्याने तो त्याचे मित्र विशाल मुन्ना सरोज (22) आणि अभिषेक पासवान यांच्यासोबत तुर्भे एमआयडीसी परिसरातील विशाल हॉटेल आणि तलावाजवळील सार्वजनिक रस्त्यावर गेला होता.
मुंबई: टॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक ॲटली कुमार यांचा आज (21 सप्टेंबर) वाढदिवस असतो. या खास दिवशी त्यांना आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट ...
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान तिघांनी तलवारीसारखे दिसणारे शस्त्र वापरून केक कापल्याचा आरोप आहे. या प्रकाराचा व्हिडिओही त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रीलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर तुर्भे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगण्यास आणि त्याचा वापर करण्यास बंदी असतानाही संबंधित तरुणांनी शस्त्राचा वापर केल्याचे पोलिसांनी सांगितले. नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी शस्त्र बाळगण्याबाबत जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचेही उल्लंघन झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी अजित मुन्ना सरोज, विशाल मुन्ना सरोज आणि अभिषेक पासवान यांच्याविरोधात भारतीय शस्त्र कायदा 1959 मधील कलम 4 आणि 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 37(1)(अ) आणि 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुर्भे पोलीस करत आहेत.