मुंबई : मिरा-भाईंदर (Mira-BHayandar) परिसरातील शाळांमध्ये पर्यूषण पर्वाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या आहारावर लादल्या जाणाऱ्या निर्बंधांचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्या 'सेव्हन स्क्वेअर' शाळेतील वादानंतर आता भाईंदर येथील 'तपोवन विद्यालया'तही असाच एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणली म्हणून शाळेने त्याला चक्क ५० रुपयांचा दंड ठोठावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेत शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
पर्यूषण काळातील आहार नियमांवरून वाद
तपोवन विद्यालयाने पर्यूषण पर्वाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना डब्यात विशिष्ट खाद्यपदार्थ न आणण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये मांसाहारासोबतच कांदा, लसूण, बीट आणि जमिनीखाली उगवणाऱ्या इतर भाज्यांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, एका विद्यार्थ्याने नेहमीप्रमाणे आपल्या डब्यात मेथीची भाजी आणली. हे शिक्षकांच्या निदर्शनास आल्यावर त्याला नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत ५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. एवढ्यावरच न थांबता, विद्यार्थ्याचा डबा बाजूला ठेवून त्याला शाळेच्या उपाहारगृहातून (कॅन्टीन) दुसरे अन्न विकत घेऊन खाण्यास सांगण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
शिक्षण विभागाची शाळेला 'कारणे दाखवा' नोटीस
या घटनेची माहिती मिळताच शिक्षण अधिकाऱ्यांनी तपोवन विद्यालय प्रशासनाला 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. विद्यार्थ्यांना असा दंड आकारण्याचा अधिकार शाळेला कोणत्या नियमांतर्गत मिळाला? तसेच धार्मिक किंवा सांस्कृतिक कारणास्तव आहारावर असे निर्बंध लादण्यासंदर्भात शाळेने काय आदेश जारी केले होते, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने मागवले आहे.
पालकांमध्ये संतापाचे वातावरण; पुढील कारवाईकडे लक्ष
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आहारावर धार्मिक किंवा सांस्कृतिक नियम सक्तीने लादले जाऊ शकतात का, यावरून आता नवीन शैक्षणिक व सामाजिक वाद निर्माण झाला आहे. शाळेच्या अशा मनमानी कारभारावर पालकांनी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका शिक्षण विभागाकडून शाळेच्या उत्तरानंतर काय कायदेशीर कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.