Tuesday, September 22, 2026

Nashik Kumbh Mela 2027 : ओढा-देवळाली रेल्वे स्थानकांची पाहणी, लाखो भाविकांच्या गर्दीच्या नियोजनाला वेग

Nashik Kumbh Mela 2027 : ओढा-देवळाली रेल्वे स्थानकांची पाहणी, लाखो भाविकांच्या गर्दीच्या नियोजनाला वेग
Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या पर्वणीदरम्यान मोठ्या संख्येने भाविक रेल्वेने नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ओढा आणि देवळाली रेल्वे स्थानकांची विविध शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. या पाहणीमध्ये नाशिकच्या उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, रेल्वेच्या भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे तसेच नाशिक तालुका मास ट्रान्सपोर्ट अथॉरिटी आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

गर्दी नियंत्रणासाठी होल्डिंग एरियाची पाहणी

कुंभमेळ्याच्या प्रमुख पर्वणीच्या काळात रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरते होल्डिंग एरिया उभारणे, भाविकांच्या प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करणे तसेच गर्दीचे नियमन करण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक आणि मदतकार्य तातडीने सुरू करता यावे, यासाठी ग्रीन कॉरिडॉर निश्चित करण्याच्या दृष्टीनेही स्थानक परिसराची पाहणी करण्यात आली.

साधुग्राम आणि रामकुंडासाठी शटल बस

रेल्वेने नाशिकमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांना साधुग्राम आणि रामकुंड परिसरात पोहोचवण्यासाठी शटल बस सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी स्थानकांपासून बससेवेसाठी स्वतंत्र आणि सुलभ मार्ग उपलब्ध होऊ शकतो का, याचीही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. स्थानक परिसरात बस आणि इतर वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, तसेच भाविकांना सुरक्षितपणे पुढील ठिकाणी जाता यावे, यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्थेवर अधिकाऱ्यांनी चर्चा केली.

रेल्वे, पोलीस आणि प्रशासनाचा समन्वय

कुंभमेळ्याच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासन, पोलीस, वाहतूक यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक आहे. त्या दृष्टीने विविध यंत्रणांच्या जबाबदाऱ्या आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद यावरही पाहणीदरम्यान चर्चा करण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ व्हावा, तसेच गर्दीच्या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने ही संयुक्त पाहणी महत्त्वाची मानली जात आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >