Wednesday, September 23, 2026

Pune Cyber Crime : डिजिटल अरेस्टचा धक्कादायक प्रकार! पुण्यातील 74 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला 1.28 कोटींचा गंडा

Pune Cyber Crime : डिजिटल अरेस्टचा धक्कादायक प्रकार! पुण्यातील 74 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला 1.28 कोटींचा गंडा

पुणे : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सायबर भामट्यांनी पुण्यातील ७४ वर्षीय निवृत्त सरकारी अधिकाऱ्याची तब्बल 1 कोटी 28 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दूरसंचार विभाग आणि मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला जाळ्यात ओढले. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Cyber Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्ट रोजी पीडित व्यक्तीला एका महिलेचा फोन आला. तिने दूरसंचार विभागातून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून सिमकार्ड घेण्यात आले असून, त्याद्वारे मुंबईत धमकीचे फोन आणि अश्लील व्हिडिओ पाठवण्यात आल्याचा दावा तिने केला.

यानंतर मुंबई गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने फोन करून या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्याचे सांगितले. आरोपींनी विश्वास बसावा यासाठी बनावट एफआयआर आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित कागदपत्रेही पाठवली. ज्येष्ठ नागरिक असल्याने तपासात मदत करण्याचे आश्वासन देत त्यांनी पीडित व्यक्तीकडून गुंतवणूक आणि बचतीची माहिती मिळवली. (Pune Cyber Crime)

27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान आर्थिक तपासणीच्या नावाखाली चार व्यवहारांतून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण 1.28 कोटी रुपये हस्तांतरित करण्यास त्यांना भाग पाडण्यात आले. संशय आल्यावर पीडित व्यक्तीने नातेवाइकांना हा प्रकार सांगितला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. (Pune Cyber Crime)

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम 308 (खंडणी), 318 (फसवणूक), 319 (तोतयागिरी करून फसवणूक) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66सी (ओळख चोरी) आणि 66डी (संगणकीय साधनांचा वापर करून तोतयागिरीद्वारे फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, यंदा शहर पोलिसांकडे डिजिटल अरेस्टचे 95 गुन्हे नोंदवण्यात आले असून, त्यापैकी 36 गुन्ह्यांची उकल झाली आहे. या प्रकरणांमध्ये 71 जणांना अटक करण्यात आली आहे. अशा फसवणुकीतील बहुतांश पीडित ज्येष्ठ नागरिक असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. (Pune Cyber Crime)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >