Wednesday, September 23, 2026

Surat crime news : माजी कर्मचाऱ्याचा राग अनावर, 24 कोटींची झाली राख! सुरतच्या टेक्सटाईल मार्केटमध्ये आग; नेमकं काय आहे प्रकरण?

Surat crime news : माजी कर्मचाऱ्याचा राग अनावर, 24 कोटींची झाली राख! सुरतच्या टेक्सटाईल मार्केटमध्ये आग; नेमकं काय आहे प्रकरण?

सुरत : सुरतमधील कापड बाजारात थकलेले  10 हजार रुपये न मिळाल्याच्या रागातून माजी कर्मचाऱ्याने दुकानांना आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विनोद पंडित सावले (वय 33) याला अटक केली आहे. या आगीत 14 दुकाने जळून खाक झाली असून सुमारे 24 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वारंवार सांगूनही पैसे देत नसल्याचा राग

पोलिसांच्या माहितीनुसार, विनोद सावले हा श्याम संगिनी टेक्सटाईल मार्केटमधील दुकान क्रमांक 639 येथे अकाउंटंट म्हणून काम करत होता. एप्रिल 2026 मध्ये त्याने नोकरीला सुरुवात केली होती. मात्र, जूनमध्ये त्याने काम सोडले. पूर्वीच्या मालकाकडून आपले 10 हजार रुपये येणे बाकी असल्याचा दावा त्याने केला होता. फोनवरून वारंवार पैशांची मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने तो नाराज होता.

8 सप्टेंबरच्या रात्री सावलेने पेट्रोल पंपावरून 150 रुपयांचे पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीत खरेदी केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तो बाजारात पोहोचला. बाजारातील वर्दळ कमी होईपर्यंत जिन्याजवळ लपून बसल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तो सहाव्या मजल्यावर गेला. तेथे पूर्वीच्या मालकाच्या दुकानाबाहेर ठेवलेल्या कापडाच्या गठ्ठ्यांवर पेट्रोल ओतून त्याने आग लावली.

तब्बल 14 तास आग

या आगीमुळे सहाव्या मजल्यावरील कापड आणि दुकाने जळून खाक झाली. आगीचा फटका पाचव्या मजल्यालाही बसला. तब्बल 14 तास आग धुमसत राहिल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांना शोध घेत असल्याचे समजल्यानंतर सावले पत्नी आणि लहान मुलासह सुरतहून अयोध्येला गेला होता. चेहरा कापडाने झाकलेला असतानाही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला. सुरतला परतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा