Ganesh Visarjan 2026 : आज, 25 सप्टेंबर रोजी देशभरात गणेशोत्सवाची सांगता होत असून, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत भाविक मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने बाप्पाला निरोप देत आहेत. धार्मिक परंपरेनुसार, गणेश विसर्जनापूर्वी बाप्पाची विधीवत पूजा केली जाते. नैवेद्य दाखवून आरती केली जाते आणि त्यानंतर जयघोषात गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. काही कुटुंबांमध्ये दीड दिवस, पाचवा किंवा सातवा दिवस अशा विविध परंपरांनुसार विसर्जन केले जाते. मात्र, सार्वजनिक गणेश मंडळे आणि मंदिरांमध्ये स्थापित गणेशमूर्तींचे विसर्जन प्रामुख्याने अनंत चतुर्दशीला केले जाते.
अनंत चतुर्दशीची तिथी कधीपासून कधीपर्यंत?
पंचांगानुसार यंदा चतुर्दशी तिथी 24 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11 वाजून 18 मिनिटांनी सुरू झाली असून, 25 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11 वाजून 06 मिनिटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.
गणेश विसर्जनासाठी शुभ मुहूर्त
पंचांगानुसार 25 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनासाठी खालील शुभ चौघडिया दिले आहेत :
- सकाळी : 6:28 ते 10:59
- दुपारी : 12:30 ते 2:01
- सायंकाळी : 5:02 ते 6:32
- रात्री : 9:31 ते 11:01
बाप्पाला निरोप देण्यासाठी गुलालाची उधळण, फुलांचा वर्षाव आणि ढोल-ताशांचा कडकडाट यामुळे वातावरण भारावून गेले आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने ...
विसर्जनापूर्वी बाप्पाची पूजा कशी करावी ?
गणेश विसर्जनापूर्वी बाप्पाची पूजा करण्याची साधारण पद्धत पुढीलप्रमाणे आहे :
1. स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा : पूजा करण्यापूर्वी घरातील सदस्यांनी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. पूजेची जागाही स्वच्छ करावी.
2. दिवा आणि धूप लावा : गणपतीसमोर दिवा लावून अगरबत्ती किंवा धूप दाखवावा आणि बाप्पांना नमस्कार करावा.
3. प्रार्थना व संकल्प करा : बाप्पांचे स्मरण करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी. पूजेत झालेल्या चुका क्षमा करण्याची विनंती करावी.
4. नैवेद्य अर्पण करा : मोदक, फळे, पेढे किंवा घरातील परंपरेनुसार आवडीचा नैवेद्य बाप्पांना दाखवावा.
5. फुले, दुर्वा आणि अक्षता अर्पण करा : गणपतीला फुले, दुर्वा आणि अक्षता वाहाव्यात.
6. आरती करा : कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे गणपतीची आरती करावी.
7. उत्तरपूजा करा : बाप्पांचे आभार मानून पुढील वर्षी पुन्हा लवकर येण्याची प्रार्थना करावी.
गणपती बाप्पाचे विसर्जन कसे करावे?
पूजा पूर्ण झाल्यानंतर गणपतीची मूर्ती फुलांनी सजवलेल्या ताटात किंवा पाटावर अलगद ठेवावी. घरातील ज्येष्ठ व्यक्तीने औक्षण करून बाप्पांना निरोप द्यावा. त्यानंतर “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” असा जयघोष करत विसर्जनस्थळी जावे. विसर्जनाच्या वेळी मूर्तीला कोणताही धक्का लागू नये याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास नैसर्गिक जलस्रोतांऐवजी स्थानिक प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाचा वापर करावा. मूर्तीचे विसर्जन करताना घाई, धक्काबुक्की आणि गर्दी टाळावी. तसेच फुले, हार आणि इतर पूजासाहित्य नदी, तलाव किंवा जलाशयात न टाकता प्रशासनाने निश्चित केलेल्या निर्माल्य कलशात किंवा निर्माल्य संकलन केंद्रात जमा करावे.
भक्तिभावासोबत पर्यावरणाचीही काळजी घ्या
गणेशोत्सवाची सांगता करताना भक्तिभावासोबत पर्यावरणाची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. विसर्जनस्थळी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सुरक्षितपणे बाप्पांना निरोप द्यावा. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!