Friday, September 25, 2026

IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित-विराट रचणार विक्रम, हा रेकॉर्ड रडारवर

IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित-विराट रचणार विक्रम, हा रेकॉर्ड रडारवर
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा एकदा मैदानात पाहण्याची संधी त्याचे चाहते आणि क्रीडाप्रेमी यांना मिळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 27 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार असून, या सामन्यात भारतीय संघाचे दोन्ही दिग्गज फलंदाज प्लेइंग 11 चा भाग असणार आहेत. या पहिल्याच सामन्यात हे दोन्ही स्टार खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन ऐतिहासिक विक्रम रचण्याच्या वेशीवर उभे आहेत. दरम्यान, रोहित शर्मा या मालिकेत खेळेल की नाही याबाबत बरीच चर्चा रंगली होती. पण लॉर्ड्सवर रंगलेल्या इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात त्याने शतक ठोकलं आणि टीकाकारांची तोंडं बंद केली होती. आता तशाच कामगिरीची अपेक्षा वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत आहे.

विराट कोहली 15 हजारांचा टप्पा गाठणार

विराट कोहली क्रिकेट जगतात नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15,000 धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 59 धावांची गरज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केल्यास, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंतर वनडे क्रिकेटमध्ये 15 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरेल. विराट कोहलीने आपल्या 314 वनडे सामन्यांच्या कारकिर्दीत 15,903 चेंडूंचा सामना करत 14,941 धावा कुटल्या आहेत. यादरम्यान तो 47 वेळा नॉट आऊट राहिला असून 18 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर 54 शतके आणि 79 अर्धशतके ठोकली असून यामध्ये 1,389 चौकार आणि 172 षटकारांचा समावेश आहे.

रोहित शर्माला '12 हजारी' क्लबचे वेध

रोहित शर्मादेखील एका मोठ्या विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. रोहित शर्माला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12,000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी आता केवळ 105 धावांची आवश्यकता आहे. रोहित शर्माने आतापर्यंत खेळलेल्या 288 वनडे सामन्यांमध्ये 12,784 चेंडूंचा सामना करत 11,895 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आपल्या कारकिर्दीत 37 वेळा नॉट आऊट राहिलेला रोहित 16 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 34 शतके, 62 अर्धशतके आणि तब्बल 3 द्विशतके ठोकण्याचा अनोखा विश्वविक्रम केला असून त्याच्या नावावर 1,125 चौकार आणि 369 षटकार नोंदवले गेले आहेत. 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या पहिल्या सामन्यात हे दोन्ही फलंदाज नवा इतिहास रचणार का, याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >