Monday, November 9, 2026

सँडपेपरगेट प्रकरणी अखेर डेविड वॉर्नरने मौन सोडले, उस्मान ख्वाजा काय म्हणाला? त्यावर केलं भाष्य

क्रिकेट इतिहासात सँडपेपरगेट प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणात स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांची नावं होती. असं असताना इतक्या वर्षानंतर डेविड वॉर्नरने याबाबत बोलण्याची हिम्मत केली. नेमकं काय घडलं? याबाबत डेविड वॉर्नरने खुलासा केला आहे.

क्रिकेटविश्वात 2018 मध्ये सँडपेपरगेट प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर बरीच टीका झाली होती. असं असताना आठ वर्षानंतर पु्न्हा हे प्रकरण समोर आलं आहे. माजी क्रिकेटपटू डेविड वॉर्नर याने उस्मान ख्वाजाने व्यक्त केलेल्या दाव्याचं समर्थन केलं आहे. उस्मान ख्वाजाने सांगितलं की, सँडपेपरगेट प्रकरणाची संपूर्ण संघाला माहिती होती. वॉर्नरने उस्मान ख्वाजाच्या या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. तसेच त्याने केलेलं वक्तव्य 100 टक्के खरं असल्याचं सांगितलं आहे. इतकंच आठ वर्षांपूर्वी झालेल्या तपासाच्या निष्पक्षतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर उस्मान ख्वाजाने त्याच्या 'पेशन्स' या पुस्तकात दावा केला आहे. या पुस्तकात उस्मान ख्वाजाने लिहिलं की, मार्च 2018 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीदरम्यान झालेल्या सँडपेपरगेट प्रकरणात संपूर्ण संघ सहभागी होता.

डेविड वॉर्नर इन्स्टाग्राम पोस्ट करत काय म्हणाला?

डेविड वॉर्नर याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्याने म्हंटलं आहे की, "मी पूर्णपणे उस्मान ख्वाजाच्या पाठीशी आहे. तुम्ही जे काही केले आहे त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. तुम्ही जे काही सांगितले आहे ते 100% खरे आहे. आता सर्वांना सत्य कळले आहे, ते सर्वांसमोर उघड झाले आहे. लोकांना सत्य जाणून घ्यायचे होते आणि तुम्ही पुढे येऊन ते सांगितले. आता लोक विचारत आहेत की हे आठ वर्षांनंतर का घडत आहे, किंवा पुस्तक विकण्याची चर्चा का सुरू आहे. ही उस्मानची कहाणी आहे, हा उस्मानचा दृष्टिकोन आहे. त्याने त्या दिवसापासून पुढे सर्व काही लिहून ठेवले आहे. धन्यवाद उजी "
 
View this post on Instagram
 

A post shared by David Warner (@davidwarner31)

डेविड वॉर्नर म्हणाला की, 'संपूर्ण मुलाखत प्रक्रिया घाईघाईने आणि अत्यंत वाईट पद्धतीने पार पडली होती. उस्मान कॅमरून बँक्रॉफ्टच्या शेजारी बसला होता, तरीही त्याची मुलाखत घेण्यात आली नाही. याला योग्य तपास कसे म्हणता येईल? हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. आम्ही इथे कोणावरही बोट दाखवण्यासाठी आलेलो नाही; हा मुद्दा उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेचा आहे. सत्य समोर यावे आणि त्याचा योग्य तपास व्हावा, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. कदाचित आता लोकांनी व्यक्तींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी किंवा त्यांच्यावर उत्तरदायित्वाची मागणी करण्याऐवजी, तपासकर्त्यांनी त्यांचे काम कसे केले याबद्दल त्यांच्याकडून उत्तरे मागण्याची वेळ आली आहे.' सँडपेपरगेट प्रकरण घडल्यानंतर डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरून बँक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. आता उस्मान ख्वाजाने हे प्रकरण पुन्हा एकदा उजेडात आणलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. असं असताना तत्कालीन प्रशिक्षक डॅरेन लेहमन याने ख्वाजाचे आरोप फेटाळून लावले आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >