Friday, September 25, 2026

Jalgaon Ganesh Visarjan 2026 : जळगावात गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; 4 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात

Jalgaon Ganesh Visarjan 2026 : जळगावात गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; 4 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात

Jalgaon Ganesh Visarjan 2026 :अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग, गर्दीची ठिकाणे, संवेदनशील चौक आणि विसर्जनस्थळांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चार हजारांहून अधिक पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात राहणार आहेत.

यंदा शहरातील 2 हजार 53 सार्वजनिक गणेश मंडळांसह मोठ्या संख्येने घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे प्रमुख रस्ते, चौक आणि विसर्जन मार्गांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था, गर्दीचे व्यवस्थापन आणि वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी स्वतंत्र नियोजन केले आहे.

राज्य राखीव पोलीस दलासह विशेष पथके तैनात

विसर्जन बंदोबस्तासाठी 3 पोलीस उपअधीक्षक, 15 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक, 75 महामार्ग वाहतूक पोलीस आणि 25 रेल्वे पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 150 आणि नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 50 कर्मचारीही बंदोबस्तात सहभागी होणार आहेत. याशिवाय 1,823 पुरुष होमगार्ड आणि 286 महिला होमगार्ड तैनात राहणार आहेत. राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि इतर विशेष पथकांनाही आवश्यकतेनुसार तैनात ठेवण्यात आले आहे.

ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे मिरवणुकीवर नजर

गणेश विसर्जन मिरवणुकांवर तांत्रिक माध्यमातूनही लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रमुख मिरवणूक मार्ग आणि गर्दीच्या परिसरात दोन ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखरेख केली जाणार आहे. यासोबतच शहरातील उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक यंत्रणेचा वापर करून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास संबंधित पथकाला तातडीने माहिती देऊन आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वाहतुकीसाठी विशेष नियोजन

विसर्जन मिरवणुकांमुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रमुख मिरवणूक मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात आणि गर्दी नियंत्रणात राहावी, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मिरवणूक मार्गावर जाणे टाळून पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार अवजड वाहनांच्या प्रवेशावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

डीजेच्या आवाजावर पोलिसांची नजर

गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या वापराबाबतही पोलीस प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत. निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. गणेश मंडळांनी ध्वनी मर्यादा आणि प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विसर्जनस्थळांवरही कडेकोट बंदोबस्त

मिरवणूक मार्गांसोबतच मेहरूण तलावासह शहरातील निश्चित करण्यात आलेल्या विसर्जनस्थळांवरही पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. नागरिकांची सुरक्षितता, गर्दीचे नियोजन आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात आला आहे. मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवणार असून, गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ तातडीने तैनात केले जाणार आहे. गणेश विसर्जनाचा उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >