Friday, September 25, 2026

Nashik Crime News : शेतजमिनीच्या दस्त नोंदणीसाठी 10 हजारांची लाच मागितली, दुय्यम निबंधकासह खासगी व्यक्ती रंगेहात जाळयात

Nashik Crime News : शेतजमिनीच्या दस्त नोंदणीसाठी 10 हजारांची लाच मागितली, दुय्यम निबंधकासह खासगी व्यक्ती रंगेहात जाळयात

Nashik Crime News : शेतजमिनीच्या खरेदी दस्ताची नोंदणी करून देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुय्यम निबंधकासह एका खासगी व्यक्तीला रंगेहात पकडले. तडजोडीनंतर 4 हजार 200 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.या कारवाईत प्रमोद लक्ष्मण वामन (५७, दुय्यम निबंधक वर्ग-२, नाशिक ४, रा. रिद्धिसिद्धी अपार्टमेंट, ए विंग, दुसरा माळा, २०२, लोकमान्य नगर, नाशिकरोड, नाशिक) आणि खासगी व्यक्ती योगेश बाळू डांगले (३८, रा. पिंपळास रामाचे, ता. निफाड, जि. नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत.

शेतजमिनीच्या दस्त नोंदणीसाठी लाचेची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वकील असून त्यांच्या पक्षकाराच्या शेतजमिनीच्या खरेदी दस्ताची नोंदणी करून देण्यासाठी दुय्यम निबंधक प्रमोद वामन यांनी 10 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष मागणीची पडताळणी केली. त्यावेळी वामन यांनी स्वतःसह खासगी व्यक्ती योगेश डांगले यांच्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याचे विभागाने सांगितले.तडजोडीनंतर प्रथम 5 हजार आणि अखेरीस 4 हजार 200 रुपये स्वीकारण्याचे ठरले.

कार्यालयातच रचला सापळा

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 4, नाशिक येथे वामन यांच्या सांगण्यावरून खासगी व्यक्ती योगेश डांगले याने तक्रारदाराकडून पंचांसमक्ष 4 हजार 200 रुपयांची लाच स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने प्रमोद वामन आणि योगेश डांगले या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 7, 7अ आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विकास लोंढे यांनी, तर पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस हवालदार प्रभाकर गवळी, अमलदार किरण धुळे, सुरेश चव्हाण आणि नितीन नेटारे यांचा समावेश होता.

लाच मागितल्यास एसीबीकडे तक्रार करण्याचे आवाहन

भ्रष्टाचारासंदर्भात माहिती असल्यास किंवा शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी लाच मागत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टोल फ्री : 1064 दूरध्वनी : 0253-2575628 / 0253-2578230 व्हॉट्सॲप : 9930997700 / 9545031064

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >