कोल्हापूर : दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज, 25 सप्टेंबर रोजी राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. अशातच कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान धक्कादायक घटना घडली. वाय. पी. पोवार नगर मंडळाची 21 फूट उंचीची गणेशमूर्ती मिरवणुकीत अचानक रस्त्यावर कोसळली. शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास गोखले कॉलेज चौकात ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. ( Kolhapur Ganpati Visarjan 2026)
Ganesh Visarjan 2026 : आज अनंत चतुर्दशी ! बाप्पाला निरोप देण्यापूर्वी जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि विसर्जनाची पद्धत
Ganesh Visarjan 2026 : आज, 25 सप्टेंबर रोजी देशभरात गणेशोत्सवाची सांगता होत असून, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. ...
विद्युत तारेला स्पर्श झाल्यानंतर मूर्तीचा तोल गेला
मिळालेल्या माहितीनुसार, वाय. पी. पोवार नगर मंडळाची गणेशमूर्ती ट्रॅक्टर ट्रॉलीमधून विसर्जनासाठी नेण्यात येत होती. ही मूर्ती एका पायावर उभी होती आणि काहीशी झुकलेल्या अवस्थेत होती. गोखले कॉलेज चौकाजवळ मिरवणूक पोहोचल्यानंतर मूर्तीचा संपर्क रस्त्यावरील विद्युत तारेशी झाला. त्यानंतर काही क्षणांतच मूर्तीचा तोल गेला आणि ती थेट रस्त्यावर कोसळली.
मूर्ती कोसळताच कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा
महाकाय गणेशमूर्ती अचानक कोसळल्याने मिरवणुकीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्येही काही वेळ सन्नाटा पसरला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत परिस्थिती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर क्रेनच्या मदतीने मूर्ती रस्त्याच्या बाजूला करण्यात आली.
मंडळाच्या कार्यकर्त्यांचा महावितरणवर आरोप
दरम्यान, या घटनेनंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या मार्गावरून गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येणार होती, त्या मार्गावरील विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्या हटवण्याची विनंती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आधीच केली होती. मात्र, त्यावर योग्य ती कार्यवाही झाली नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे विद्युत तारेला मूर्तीचा स्पर्श होऊन ही घटना घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.