Plane Crash : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये विमानाचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती काँगोच्या सैन्याने दिली आहे. या घटनेमुळे देशाच्या लष्करी आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये लष्कराच्या दोन बड्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू
‘असोसिएटेड प्रेस’च्या वृत्तानुसार, मृतांमध्ये काँगोच्या लष्करी न्यायालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मुटोंबो कातालायी टिएंडे आणि सशस्त्र दलाचे ऑडिटर जनरल लेफ्टनंट जनरल बाकुमी लिकुलिया यांचा समावेश आहे. टिएंड हे लष्करी न्यायालय विभागाचे प्रमुख होते. तर लिकुलिया हे सशस्त्र दलाचे ऑडिटर जनरल होते.काँगोच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल एफोमी एकेंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील शिष्टमंडळातील 12 सदस्य आणि केबिन क्रू या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. विमानातील कोणालाही वाचवता आले नाही.
बॉलिवूड अभिनेता आणि फिल्म निर्माता यशपाल शर्मा यांचा सख्खा भाऊ राजेश कुमार याला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना हरियाणा लाचलुचपत प्रतिबंधक ...
किक्विटहून किन्शासाकडे परतत होते विमान
स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमान हे काँगोतील किक्विट शहरातून राजधानी किंशासा येथे परतत होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटना घडल्याच सांगण्यात येत आहे. तांत्रिक समस्येमुळे वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर केंगे परिसरात विमान कोसळले. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
अपघाताच्या कारणांचा शोध सुरू
दरम्यान, विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँगोच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाचे अध्यक्ष ट्रायफोन किंकी मुलुंबा यांनी अपघाताचे अचूक कारण तातडीने सांगणे कठीण असल्याचे म्हटले आहे. अपघाताची परिस्थिती आणि दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
M23 सोबत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठी दुर्घटना
काँगोचे लष्कर सध्या देशाच्या पूर्व भागात M23 सह अनेक बंडखोर गटांशी लढा देत आहे. M23 बंडखोरांना रवांडाचा पाठिंबा असल्याचे मानले जाते. अलीकडच्या काळात बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यांनंतर अनेक महत्त्वाची शहरे त्यांच्या ताब्यात गेल्याने हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अशा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर परिस्थितीत दोन बड्या लष्करी अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू होणे हा काँगोच्या लष्करासाठी मोठा धक्का मानला जात आहे.