Monday, September 28, 2026

Chakan MIDC : चाकण 'एमआयडीसी'मधील कोंडी फोडण्यासाठी साठी १ हजार ८२६ कोटींचा आराखडा

Chakan MIDC : चाकण 'एमआयडीसी'मधील कोंडी फोडण्यासाठी साठी १ हजार ८२६ कोटींचा आराखडा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; डिसेंबरपासून कामांना सुरुवात करण्याचे नियोजन

मुंबई : औद्योगिक पट्ट्यामुळे सातत्याने वाढणारी वाहतूक कोंडी, पावसाळ्यात साचणारे पाणी, अपुरी रस्ते व्यवस्था आणि नागरी सुविधांवरील ताण दूर करण्यासाठी चाकण आणि हिंजवडीसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. चाकणमधील रस्ते, वाहतूक आणि पावसाळी पाणी निचऱ्यासह विविध नागरी सुविधांसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांच्या, तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ४२६.५४ कोटी रुपयांच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मंजुरी दिली. डिसेंबरपासून कामे सुरू करून पुढील पावसाळ्यापूर्वी चाकणमधील वाहतूक आणि पाणी निचऱ्याच्या समस्येत लक्षणीय सुधारणा करण्याचे नियोजन आहे. (Chakan MIDC)

सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी झालेल्या बैठकीत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या आराखड्याचे सादरीकरण केले. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे सचिव या वेळी उपस्थित होते. चाकणच्या विकासकामांसाठी एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि अन्य संबंधित यंत्रणांनी स्वतंत्रपणे काम न करता समन्वयाने काम करावे, तसेच विविध विभागांच्या निधीचा एकत्रित वापर करावा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.

चाकण औद्योगिक परिसरातील पावसाळी पाणी निचऱ्याचा प्रश्न आराखड्यात प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे. परिसरातील सुमारे ७८ किलोमीटर लांबीच्या नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याने पाण्याचा प्रवाह अडत असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. परिणामी पावसाळ्यात औद्योगिक आस्थापनांमध्ये पाणी शिरणे, वाहतूक विस्कळित होणे आणि काही वेळा कंपन्यांचे कामकाज बंद ठेवण्याची परिस्थिती निर्माण होते.(Chakan MIDC)

नैसर्गिक नाले मोकळे करणे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे, कल्व्हर्ट आणि पुलांची क्षमता वाढविणे तसेच आवश्यक ठिकाणी पाणी साठविण्याची व्यवस्था उभारण्याचे नियोजन आहे. सिंचन विभागाच्या सर्वेक्षणाच्या आधारे नाल्यांचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची सुमारे ७० ते ८० टक्के कार्यवाही पूर्ण झाली असून उर्वरित अडथळे टप्प्याटप्प्याने दूर केले जाणार आहेत. काही ठिकाणी बांधकामे हटवावी लागणार असून काही ठिकाणी नैसर्गिक नाल्यांसाठी जागा उपलब्ध करून घ्यावी लागणार आहे. जून २०२७पर्यंत नाले मोकळे करून पाणी निचऱ्याची व्यवस्था पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय सुमारे ३८ किलोमीटर लांबीची रस्त्यालगतची पावसाळी गटार व्यवस्था उभारली जाणार आहे.(Chakan MIDC)

चाकण औद्योगिक परिसरातील एकूण ४९८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या जाळ्याचा अभ्यास करण्यात आला आहे. वाहतुकीची घनता, औद्योगिक महत्त्व, मालवाहतुकीची वर्दळ, रस्त्यांची स्थिती, पाणी साचण्याची समस्या, सुरक्षितता आणि जोडणी या निकषांवर पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ७५ किलोमीटर रस्त्यांची निवड करण्यात आली आहे.(Chakan MIDC)

या रस्त्यांवर पादचारी मार्ग, पावसाच्या पाण्याचा निचरा, वाहतूक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाणार आहे. उपलब्ध रस्ते हक्काच्या जागेचा अधिकाधिक वापर करून कामे केली जाणार असल्याने या टप्प्यात भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही. रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून उपलब्ध जागेचा वापर करण्याबरोबरच रस्त्यांखाली विविध सेवा वाहिन्यांसाठी स्वतंत्र जागा ठेवण्याचा प्रस्ताव आहे.

कामगारांसाठी पादचारी मार्ग

- चाकण औद्योगिक परिसरात मोठ्या संख्येने कामगारांची ये-जा होते. अनेक रस्त्यांवर स्वतंत्र पादचारी मार्ग किंवा सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याची सुविधा नसल्याने अपघाताचा धोका वाढतो. विशेषतः कामगारांच्या पाळ्या सुटल्यानंतर मोठ्या संख्येने कामगार रस्त्यावरून चालत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे निवडक रस्त्यांवर पादचारी मार्ग, सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणमार्गाच्या कामातही पादचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून चाकणकडे येणाऱ्या कामगारांमुळे खासगी वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडी होते. वाहतुकीची आकडेवारी आणि बिग डेटाचा वापर करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. विविध मार्गांवर सुमारे ५०० अतिरिक्त बसची आवश्यकता असून बससेवा वाढल्यास खासगी वाहनांचा वापर कमी होण्यास मदत होईल, असा अंदाज आहे.

सहा चौकांची पुनर्रचना, एआयवर वाहतूक नियंत्रण

चाकणमधील सहा महत्त्वाच्या चौकांची शास्त्रीय पद्धतीने पुनर्रचना केली जाणार आहे. वाहतुकीच्या प्रवाहानुसार वळणे निश्चित करणे, राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत दुभाजक दुरुस्त करणे आणि नियोजित ठिकाणीच यू-टर्नची सुविधा देणे प्रस्तावित आहे. महत्त्वाच्या चौकांवर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वाहतूक सिग्नल, कॅमेरे, रडार आणि वाहन क्रमांक ओळख प्रणाली उभारण्याचे नियोजन आहे. या सर्व यंत्रणांचे नियंत्रण मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून केले जाणार आहे. चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील वाहतुकीसाठीही एआय-आधारित अंमलबजावणी यंत्रणा उभारण्याचे नियोजन असून, वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने नियमभंगावर कारवाई केली जाणार आहे. सीसीटीव्ही आणि इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमलाही मंजुरी देण्यात आली आहे. चाकण परिसरासाठी १ ऑक्टोबरपासून महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.(Chakan MIDC)

पाच ठिकाणी पार्किंगची सुविधा

- चाकण औद्योगिक परिसरात मोठ्या वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने रस्त्यांवर वाहने उभी केली जातात. ही समस्या दूर करण्यासाठी एमआयडीसीने पाच ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध केली असून, तिचा अधिकाधिक वापर होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. रस्त्यांच्या दुभाजकांचे सुशोभीकरण आणि देखभाल खासगी संस्थांच्या सहभागातून करण्याचा प्रस्ताव आहे. औद्योगिक आस्थापनांच्या सहभागातून सार्वजनिक शौचालये आणि बसथांबे उभारण्याचाही विचार आहे. - चाकण औद्योगिक परिसरातील पाणीपुरवठा योजनेचे काम २०२७मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या चाकण इंडस्ट्री असोसिएशनमार्फत सुरू असलेली पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपविण्याचा प्रस्ताव आहे. वीजपुरवठ्याची अल्पकालीन तूट भरून काढण्यात आली असून, एमआयडीसीने जागा उपलब्ध करून दिली आहे. १०० एमव्हीए क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे काम डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. - घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्रीकृत प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे. १४ गावे आणि दोन नगर परिषदांमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा तयार करण्यात आल्या आहेत. पीएमआरडीएच्या माध्यमातून ही व्यवस्था उभारून कचरा संकलन आणि प्रक्रिया शुल्काच्या आधारे व्यवस्थापन केले जाणार आहे. पुढील आठ ते दहा महिन्यांत ही व्यवस्था कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.(Chakan MIDC)

हिंजवडीसाठी ४२६.५४ कोटींचा स्वतंत्र आराखडा

हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ४२६.५४ कोटी रुपयांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. हिंजवडीतील वीजपुरवठ्याच्या अडचणी दूर करण्यासाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहतूक आणि अन्य व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान उपलब्ध करून देण्याची प्रक्रियाही सुरू आहे. हिंजवडी परिसरातील कचरा व्यवस्थापनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका किंवा पुणे महापालिकेच्या माध्यमातून कचरा संकलन सुरू करण्याचे नियोजन आहे. चाकण आणि हिंजवडीतील कामे विविध विभागांच्या समन्वयातून वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, या आराखड्यांच्या अंमलबजावणीला डिसेंबरपासून सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.(Chakan MIDC)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >