Monday, September 28, 2026

Chandrashekhar Bawankule : दुष्काळी क्षेत्रात संपूर्ण पंचनामे झाल्याशिवाय मदतनिधी पाठवणे शेतकरी हिताचे नाही!

Chandrashekhar Bawankule : दुष्काळी क्षेत्रात संपूर्ण पंचनामे झाल्याशिवाय मदतनिधी पाठवणे शेतकरी हिताचे नाही!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; पिकानुसार मदतीचे निकष ठरवणार, दर मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीचा आढावा

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्यापेक्षा पिकांचे संपूर्ण आणि अचूक पंचनामे होणे आवश्यक आहे. पंचनामे पूर्ण होण्यापूर्वी मदत जाहीर केली तर प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मदतीचे स्वरूप निश्चित केले जाईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी स्पष्ट केले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. दुष्काळी मदतीतून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी पंचनामे अचूक करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. नुकसानाचे प्रमाण आणि संबंधित भागातील परिस्थिती विचारात घेऊन मदतीचे निकष निश्चित केले जातील. (Chandrashekhar Bawankule)

तूर, कापूस, सोयाबीन, हळद, फळबागा तसेच संत्रा उत्पादकांचे नुकसान एकसारखे नसते. त्यामुळे प्रत्येक पिकासाठी मदतीचे स्वतंत्र निकष आणि परिस्थितीनुसार वेगवेगळे पॅरामीटर विचारात घ्यावे लागतील. पंचनाम्यांच्या आधारेच मदत दिली जात असल्याने आजच्या आज मदत जाहीर करण्याची घाई करणे योग्य ठरणार नाही, असे बावनकुळे यांनी नमूद केले. मुख्यमंत्री लवकरच मदतीबाबत निर्णय जाहीर करतील, असेही त्यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule)

एनडीआरएफकडून मदत मिळवितानाही अचूक पंचनामे महत्त्वाचे आहेत. नुकसानाचे अचूक विवरण उपलब्ध असल्यास शेतकऱ्यांना योग्य मदत मिळण्यास मदत होते. त्यामुळे मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक दर मंगळवारी घेऊन राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. उपसमितीला दुष्काळी परिस्थितीचे अचूक चित्र सरकारसमोर ठेवायचे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

दुष्काळाच्या प्रश्नाचे राजकारण करण्याऐवजी सर्वांनी शेतकरी आणि शेतमजुरांना मदत करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांचा सरकारच्या मदतीवर पहिला हक्क असून अचूक पंचनामे होण्यासाठी आपला राज्यातील दौरा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.(Chandrashekhar Bawankule)

शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्याचे आदेश

- शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा करण्याचे स्पष्ट आदेश महावितरणला देण्यात आले आहेत. उपलब्ध पाणीसाठ्यातून सिंचन करता यावे यासाठी पुरेसा वीजपुरवठा आवश्यक आहे. वीजपुरवठ्यात अडचणी येत असल्यास त्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. - दरम्यान, दुष्काळाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याच्या मुद्द्यावरही बावनकुळे यांनी भाष्य केले. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला पत्र देणे हे त्यांचे काम आहे. मात्र, केवळ पवार यांनी पत्र दिले म्हणून सरकार शेतकऱ्यांना मदत करीत नाही. राज्यातील अनेक आमदार तसेच तिन्ही पक्षांच्या नेत्यांनीही दुष्काळाबाबत पत्रे दिली आहेत. दोन हजारांहून अधिक पत्रे प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. - मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते आणि त्यांनी दुष्काळाबाबत निर्णय घेतला आहे. सध्याच्या यादीतून काही तालुके वगळले गेले असतील, तर त्याचाही अभ्यास केला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.(Chandrashekhar Bawankule)

एसआयआरवरून विरोधकांवर टीका

- दरम्यान, ठाकरे बंधूंच्या एसआयआरविरोधातील मोर्चाबाबत बोलताना बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाने या प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण दिल्याचे सांगितले. एसआयआरच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि आता एसआयआरवरून शंका उपस्थित केल्या जात असल्याचे ते म्हणाले. - विरोधक बूथ पातळीवर काम करण्याऐवजी निवडणूक प्रक्रियेवर आरोप करीत असल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधान बदलले जाणार असल्याचा प्रचार करण्यात आला होता, असा आरोप करत त्यांनी विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या मतदानाचा संदर्भ दिला. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांपेक्षा प्रत्यक्ष कामावर भर असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.(Chandrashekhar Bawankule)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >