Tuesday, September 29, 2026

Ahilyanagar News: जिल्हा बँकेच्या जेवणाच्या पंगतीवर FDAचा छापा, केटररकडे परवानाच नाही

Ahilyanagar News: जिल्हा बँकेच्या जेवणाच्या पंगतीवर FDAचा छापा, केटररकडे परवानाच नाही

अहिल्यानगर (प्रतिनिधी): जिल्हा बँकेच्या सोमवारी झालेल्या सभेनंतर केशर गुलाब मंगल कार्यालयात झालेल्या जेवणादरम्यान अन्न- औषध विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्याने नगरमध्ये खळबळ उडाली आहे. पथकाने तेथील जेवणातील गुलाबजामचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले असल्याची माहिती समजली. जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यात सोमवारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी, अधिकारी आणि सभासदांसाठी आनंदधाम रस्त्यावरील केशर गुलाब मंगल कार्यालयात जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. ही व्यवस्था सुमारे दोन हजार लोकांसाठी करण्यात आली होती.

अन्न औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी सा. अ. मुल्ला यांच्यासह पथकाने दुपारी तेथे छापा टाकला. 2000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणाऱ्या केटररकडे त्यासाठी अन्न- औषध विभागाचा परवानाच नसल्याचे उघड झाले. अलीकडील काळात या विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर अन्न सुरक्षा आणि भेसळीविरोधात मोहीम उघडल्यावर अन्न- औषध विभाग ठिकठिकाणी छापे टाकत आहे. जिल्हा बँकेच्या जेवणावळीची आणि तेथील केटररच्या नियम चुकवेगिरीची माहिती समजल्यावर हा छापा टाकण्यात आला. अन्न सुरक्षेचे नियम गुंडाळून तेथे पंगत सुरू असल्याचे पथकाला दिसून आले. जिल्हा बँकेवर सध्या प्रशासकाची नियुक्ती आहे. त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापनाने हे जेवणाचे कंत्राट दिल्याचे स्पष्ट झाले.

जेवणावळीसाठी अन्न- औषध विभागाच्या अधिकृत पोर्टलवर अर्ज करून परवानगी घ्यावी लागते. तशी कोणतीही परवानगी संबंधित केटररने घेतली नसल्याचे पथकाच्या तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे आता केटरर बरोबरच बँकेचे अधिकारीही गोत्यात आले आहेत. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात जेवणावळीसाठी अन्न व औषध विभागाकडे नोंदणी असलेल्या केटररकडूनच सेवा घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, जिल्हा बँकेच्या या जेवणावळीच्या वेळी नियम बासनात ठेवून आयोजन करण्यात आले. त्यामुळे संबंधित केटररला नोटीस बजावण्यात आली आहे. हे काम संबंधित केटररला देणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्याचीही चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त गौरव जगताप यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >