Tuesday, September 29, 2026

Pune Teacher Elections: पुणे शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांचे 'ओएसडी' आमनेसामने, कोणाला संधी मिळणार?

Pune Teacher Elections: पुणे शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांचे 'ओएसडी' आमनेसामने, कोणाला संधी मिळणार?

पुणे: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारीवरून शिवसेनेतच रस्सीखेच सुरू झाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) प्रा. सचिन सानप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी या मतदारसंघातून उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे. शिक्षक मतदारसंघातून शिक्षक प्रतिनिधी असावा, अशी भूमिका सानप यांनी मांडली असून, चिवटे यांनी आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील कामांचा दाखला देत आपली दावेदारी पुढे केली आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातून शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी शिक्षकच विधानपरिषदेत प्रतिनिधी असणे आवश्यक असल्याचे सानप यांचे म्हणणे आहे. शिक्षक मतदारसंघाची रचना आणि या मतदारसंघातील मतदारांचे प्रश्न लक्षात घेता शिक्षक प्रतिनिधित्वाला प्राधान्य मिळावे, असा त्यांचा युक्तिवाद आहे. दुसरीकडे, मंगेश चिवटे यांनी गेल्या काही वर्षांत आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामांचा मुद्दा पुढे केला आहे. शिक्षकांसाठी आरोग्यविषयक उपक्रम तसेच ‘धर्मवीर आनंद दिघे शिक्षक आरोग्य कवच’ योजनेसह विविध उपक्रमांचा दाखला देत ते उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. चिवटे यांनी एम.ए., बी.एड. शिक्षण घेतले असून अध्यापनाचा अनुभव असल्याचेही नमूद केले आहे.

या उमेदवारीच्या संघर्षाला माजी मंत्री आणि आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या भूमिकेमुळे आणखी एक वळण मिळाले आहे. महायुतीकडून चिवटे यांना उमेदवारी मिळाली नाही तरी राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देऊ, अशी घोषणा पाटील-यड्रावकर यांनी केली आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला येते आणि उमेदवारीचा निर्णय कसा होतो, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील या दोन दावेदारांच्या भूमिकांमुळे पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची राजकीय तयारी आतापासूनच चर्चेत आली आहे. शिक्षक प्रतिनिधित्वाचा मुद्दा आणि आरोग्य-सामाजिक क्षेत्रातील कामाचा दाखला या दोन वेगवेगळ्या आधारांवर सानप आणि चिवटे यांच्याकडून दावेदारी पुढे केली जात आहे.

मतदारसंघाची व्याप्ती सोलापूरपर्यंत

पुणे शिक्षक मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्याचा समावेश आहे. या मतदारसंघात २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर विजयी झाले होते. या मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढण्यासाठी जयंत आसगावकर इच्छुक आहेत. त्यांनी तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे, भाजपदेखील या मतदारसंघात इच्छुक आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >