इटानगर : अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेवर गस्त घालणाऱ्या आसाम रायफल्सच्या पथकावर संशयित दहशतवाद्यांनी अचानक बेछूट गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात आसाम रायफल्सचा एक जवान हुतात्मा झाला असून अन्य चार जवान गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सीमेवरील काम सुरू असतानाच अचानक हल्ला
चांगलांग जिल्ह्यातील नामपोंग वर्तुळांतर्गत येणाऱ्या नामपोंग नाल्याजवळ सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आसाम रायफल्सच्या २१ व्या तुकडीचे जवान भारत-म्यानमार सीमेवर सुरू असलेल्या कुंपणाच्या कामाची पाहणी आणि गस्त घालत होते. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या संशयित दहशतवाद्यांनी सैनिकांवर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात ४२ वर्षीय हवालदार जनखोकाई कुकी हे जागीच हुतात्मा झाले.
परिसरात सर्च ऑपरेशन वेगाने सुरू
'NSCN (K-YA)' या संघटनेवर संशय
प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यामागे 'एनएससीएन (के-वायए)' [NSCN (K-YA)] या बंदी घातलेल्या उग्रवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचा हात असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हल्लेखोरांच्या ओळखीबाबत अद्याप सुरक्षा दलांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.
AFSPA मुदतवाढीच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वीच घटना
विशेष म्हणजे, केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशातील काही विशिष्ट भागात 'अस्वस्थ क्षेत्र कायदा' म्हणजेच 'अफस्पा' (AFSPA - Armed Forces Special Powers Act) लागू करण्याची मुदत आणखी सहा महिन्यांसाठी वाढवली आहे. १ ऑक्टोबरपासून ही नवी मुदत लागू होणार असून, त्यात तिरप, चांगलांग आणि लाँगडिंग या जिल्ह्यांचा समावेश आहे. हा निर्णय लागू होण्यास अवघे दोन दिवस उरलेले असतानाच चांगलांगमध्ये हा मोठा हल्ला झाला आहे.
भारत-म्यानमार सीमेवर सुरक्षेचे आव्हान
ईशान्य भारतातील भारत-म्यानमार सीमेवरून होणारी घुसखोरी आणि तेथील उग्रवादी संघटनांची सक्रियता सुरक्षा दलांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. सीमेपलिकडून कारवाया करून पुन्हा म्यानमारच्या हद्दीत पळून जाणे दहशतवाद्यांना सोपे जाते. यामुळेच या भागातAFSPA ची मुदत सतत वाढवण्यात येत आहे.
पोलीस आणि आसाम रायफल्सकडून सविस्तर तपासाला सुरुवात
या घटनेनंतर आसाम रायफल्सकडून अधिकृत निवेदन जारी केले जाणे बाकी आहे. चांगलांगचे पोलीस अधीक्षक (SP) किर्ली पाडू यांनी माहिती दिली की, भारत-म्यानमार सीमेवर घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच चांगलांग पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून सविस्तर माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.