नाशिक : वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंदे एमआयडीसी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छडा लावला आहे. या प्रकरणात एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांकडून गावठी कट्टा, दोन चॉपर आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. मयूर मोहन जाधव, करण सोपान आवारे, ओंकार शरद भोसले आणि रोशन धोंगडे अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्यासोबत एका अल्पवयीन बालकाचाही समावेश आहे.
मालेगाव-नाशिक महामार्गावर पोलिसांचा सापळा
वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक २८३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२) तसेच आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान संशयित मालेगावहून नाशिकच्या दिशेने एका मारुती सुझुकी एर्टिगा वाहनातून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने मालेगाव-नाशिक महामार्गावर सापळा रचला. संशयित वाहन येताच पोलिसांनी त्याला अडवत पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत एक गावठी कट्टा आणि दोन चॉपर आढळून आले. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली.
Nashik Crime : अघोरी पूजा, उतारे आणि जादूटोण्याची भीती दाखवत धुळे येथील एका महिलेकडून सुमारे १ लाख ६० हजार रुपये उकळल्याचा आरोप समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर ...
चौकशीत गोळीबारातील सहभागाची माहिती
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संशयितांनी गोंदे एमआयडीसी परिसरातील गोळीबाराच्या घटनेशी संबंधित माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास सध्या वाडीवऱ्हे पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पीएसआय सुदर्शन बोडके यांच्यासह पोलीस हवालदार प्रवीण काकड, संदीप नागपुरे, हेमंत गिलबिले, सचिन धारनकर, मयूर कांगणे, दीपक गुंजाळ, सतीश घुगे, संतोष गांगुर्डे, शिवाजी ठोंबरे, प्रवीण गांगुर्डे आणि माधव साळे यांच्या पथकाने सहभाग घेतला.
या कारवाईमुळे गोंदे एमआयडीसीतील गोळीबार प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली असून, या घटनेमागील नेमके कारण आणि इतर संबंधित बाबींचा तपास पोलीस करत आहेत.






