Thursday, October 1, 2026

MRPL Blast Mangaluru : मंगळुरूमधील MRPL प्लांटमध्ये भीषण स्फोट ! एकाचा मृत्यू, 9 जण जखमी

MRPL Blast Mangaluru : मंगळुरूमधील MRPL प्लांटमध्ये भीषण स्फोट ! एकाचा मृत्यू, 9 जण जखमी

MRPL Blast Mangaluru : कर्नाटकातील मंगळुरू येथील जोकाट्टे परिसरातील मंगळुरू रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) प्रकल्पात बुधवारी दुपारी भीषण स्फोट झाला. हा स्फोट रिफायनरीच्या तिसऱ्या प्लांटमध्ये झाल्याची माहिती असून स्फोटाचा आवाज आणि हादरा इतका तीव्र होता की, आसपासच्या परिसरातील घरे अक्षरशः हादरली. स्फोटानंतर आकाशात आगीच्या प्रचंड ज्वाला आणि दाट काळ्या धुराचे लोट उसळले, जे अनेक किलोमीटर अंतरावरून स्पष्ट दिसत होते. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून, नऊ जण जखमी झाले आहेत. मृत कामगाराची ओळख मनीष (वय 30) अशी झाली आहे. जखमींवर श्रीनिवास आणि MRPL रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्फोटाचा आवाज आणि हादरे 15 किलोमीटरपर्यंत

स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, प्रकल्पापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावरील गावांमध्येही त्याचे हादरे जाणवले. जोकाट्टे परिसरातील काही घरे, शाळा आणि धार्मिक स्थळांच्या भिंतींना तडे गेलेत. तसेच शेजारील कावूर, सुरत्कल आणि पनंबूर परिसरातील अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीचे लोट दिसत होते. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. (MRPL Blast Mangaluru)

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

स्थानिक आमदार भरत शेट्टी (MLA Bharat Shetty) यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्फोटाची वेळ वेगळी असती तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकली असती. दररोज दुपारी 12 ते 12.30 वाजण्याच्या दरम्यान कामगारांच्या शिफ्टमध्ये बदल होतो. स्फोट सुमारे 12.15 वाजता झाला. त्यामुळे पहिल्या शिफ्टमधील बहुतांश कामगार बाहेर गेले होते, तर दुसऱ्या शिफ्टमधील कामगार अद्याप प्लांटमध्ये दाखल झाले नव्हते. त्यामुळे संबंधित भागात त्यावेळी मोजकेच कामगार उपस्थित होते आणि त्यापैकी काही जण जखमी झाले.

MRPL कडून स्फोटाचे कारण स्पष्ट

MRPL अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्लांटमधील युनिट 3 मध्ये हा स्फोट झाला. या युनिटमध्ये गॅस रिफिलिंगचे काम केले जाते. याच भागातील नायट्रो सल्फेट ट्रीटमेंट बॉयलरमध्ये अचानक स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी संबंधित भागात केवळ 10 कामगार उपस्थित होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. MRPL अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सामान्य परिस्थितीत या बॉयलरच्या आसपास 100 हून अधिक कामगार काम करत असतात. दरम्यान, दुर्घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेची पुढील चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >