मुंबई : मतदार यादीच्या विशेष सखोल पडताळणीची (एसआयआर) प्रक्रिया निवडणूक आयोगाने निश्चित कार्यपद्धतीनुसार जाहीर केली असून, राजकीय पक्ष तसेच नागरिकांना त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे एसआयआरच्या नावाखाली आंदोलन करण्याला कोणतेही घटनात्मक अधिष्ठान नसल्याची टीका राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी केली. ‘आंदोलनजीवी सीजेपीचे आंदोलन म्हणजे अराजकतेचे व्याकरण आहे’, असे शेलार म्हणाले.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे आणि सहमाध्यमप्रमुख ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. शेलार म्हणाले, निवडणूक आयोगाने एसआयआरचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला असून त्याची कार्यपद्धतीही स्पष्ट केली आहे. सर्व राजकीय पक्षांना या प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. अर्ज, दावे-हरकती, सुनावणी तसेच आवश्यक कागदपत्रांबाबतची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांनाही त्याची माहिती देण्यात आली आहे. असे असताना काही राजकीय पक्ष आणि संघटना आंदोलनाची भूमिका का घेत आहेत, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.(aashish shelar)
एखाद्या प्रक्रियेबाबत आक्षेप असल्यास तो घटनात्मक आणि कायदेशीर मार्गाने मांडता येतो. निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडण्याची संधी असून न्यायालयीन मार्गही उपलब्ध आहे. या संस्थात्मक प्रक्रिया उपलब्ध असताना आंदोलनाच्या माध्यमातून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला. एसआयआरच्या माध्यमातून कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये, यासाठी आवश्यक प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. एखाद्या मतदाराच्या नावाबाबत आक्षेप असल्यास संबंधित व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यामुळे लाखो प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये, असे आवाहनही शेलार यांनी केले.
काँग्रेससह काही राजकीय पक्षांकडून एसआयआरच्या मुद्द्यावर भाजपा आणि सरकारवर सातत्याने आरोप केले जात आहेत. मात्र, निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था असून तिच्या प्रक्रियेबाबत आक्षेप असल्यास उपलब्ध संस्थात्मक मार्गांचा वापर करणे अपेक्षित आहे, असे शेलार यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेतील भाषणात घटनात्मक मार्गांचे महत्त्व अधोरेखित केले होते. घटनात्मक मार्ग उपलब्ध असताना असंवैधानिक मार्गांचा अवलंब करणे म्हणजे अराजकतेचे व्याकरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते, असा दाखला शेलार यांनी दिला. सध्याच्या परिस्थितीत बाबासाहेबांच्या या विचारांची आठवण होते, असेही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे; मात्र आंदोलनाच्या माध्यमातून घटनात्मक संस्थांबद्दल अविश्वास निर्माण करणे योग्य नाही. एसआयआर प्रक्रियेबाबत आक्षेप असल्यास ते मांडावेत; मात्र त्यासाठी उपलब्ध घटनात्मक प्रक्रियेचा अवलंब करावा, असे आवाहन शेलार यांनी केले.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र ...
विरोधकांकडून देशाची बदनामी
- भारताच्या निवडणूक प्रक्रियेचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कौतुक केले असून, २२ देशांच्या प्रतिनिधींनीही भारताच्या निवडणूक प्रक्रियेचे कौतुक केल्याचा दावा शेलार यांनी केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या निवडणूक पद्धतीचे आणि सरकारचे कौतुक झाले की विरोधक त्याविरोधात आंदोलन करून देशाची बदनामी करतात, असा आरोप त्यांनी केला.(aashish shelar)
- ‘जिथे विरोधक जिंकतात तिथे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात नाही. भाजपा जिंकली की मात्र यांचा पोटशूळ उठतो,’ अशी टीका शेलार यांनी केली. स्वतःचा अजेंडा राबविण्यासाठी राजकीय हेतूने उभे करण्यात आलेले आंदोलन शिवाजी पार्कवर करण्याचा प्रयत्न हा असंविधानिक असल्याचे ते म्हणाले. ‘आंदोलनजीवी सीजेपीच्या माध्यमातून जनतेला कदापि न्याय मिळणार नाही,’ असेही शेलार यांनी सुनावले.