मुंबई (सचिन धानजी)
मुंबईतील भविष्यातील पाणी समस्या विचारात घेता धरणांमधील गाळ उपसण्याची मागणी होत आहे. मात्र, राज्य शासनाच्या पाठबंधारे विकास महामंडळाने राज्यातील ७ धरणांमधील गाळ काढण्यास परवानगी दिली असून त्यानुसार याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या सातही प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईतील विहार व तुळशी धरणांमधील गाळ उपसण्याचा विचार केला जाणार आहे. मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा आणि मध्य वैतरणांमधील गाळाचे प्रमाण कमी असल्याने मुंबईतील विहार व तुळशीतील गाळ काढण्याचा विचार राज्यातील सात धरणांमधील गाळा काढल्यानंतर केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
जलसंपदा विभागाच्या २२ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयामध्ये राज्यातील सात मोठ्या पाटबंधारे प्रकल्पांमधून प्रायोगिक तत्त्वावर जलाशयातील गाळ व गाळमिश्रित वाळूचे निष्कासन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सोलापूरमधील उजनी प्रकल्प, नाशिकमधील गिरणा प्रकल्प, भंडाऱ्यातील गोसीखुर्द प्रकल्प, अहिल्यानगर येथील मुळा प्रकल्प, संभाजीनगरमधील जायकवाडी प्रकल्प, जळगावमधील हतनूर प्रकल्प, साताऱ्यातील कोयना प्रकल्प या सात प्रकल्पांमध्ये ही योजना प्रायोगिक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या कामाची अंमलबजावणी संबंधित पाटबंधारे विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. या सात प्रकल्पांमध्ये सदर योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी झाल्यानंतर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर या योजनेच्या आधारे मुंबई महानगरपालिकेच्या धरणांतील गाळ काढण्यासंदर्भात उचित कार्यवाही करण्यात येईल,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबई शहराला बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विहार, तुळशी, तानसा, मोजक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि भातसा या सात तलावांमधून पाणीपुरवठा कैला जातो. त्यापैकी अप्पर वैतरणा आणि भातसा ही दोन धरणे राज्य शासनाच्या अखत्यारित आहेत. मुंबईला होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये विहार व तुळशी या दोन तलावांमधून होणारा पुरवठा हा एकूण पुरवठ्याच्या मानाने अल्प आहे. तानसा, मोडक सागर आणि मध्य वैतरणा ही तिन्ही धरणे महानगरपालिकेच्या मालकीची प्रमुख धरणे आहेत. ही धरणे शहापूर व मोखाडा तालुक्यांमध्ये आहेत.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मुंबई 3.0 आणि मुंबई 4.0 च्या नियोजनासाठी अत्यंत मह ...
केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) यांची नियुक्ती महानगरपालिकेच्या तलावातील गाळ सर्वेक्षणासाठी केली होती. यासंस्थे मार्फत विहार तलावाचे गाळ सर्वेक्षण सुदूर संवेदन तंत्राने आणि तुळशी धरणाचे गाळ सर्वेक्षण पूर्ण करण्यात येऊन गाळ सर्वेक्षणाअंती मे २०२४ मध्ये पाणी साठवण क्षमतेत अनुक्रमे १६.४२ टक्के व १४.९८ टक्के घट निदर्शनास आली आहे. तानसा धरणाचे गाळ सर्वेक्षण सुदूर संवेदन तंत्राने ऑगस्ट २०२२ मध्ये करण्यात आले व पाणी साठवण क्षमतेत १५.०२३% घट, मोडक सागर गाळ धरणाचे सर्वेक्षण ऑगस्ट २०२३ मध्ये पूर्ण करण्यात येऊन पाणी साठवण क्षमतेत ८.९८६% घट व मध्य वैतरणा धरणाचे गाळ सर्वेक्षण फेब्रुवारी २०२३ मध्ये सुदूर संवेदन तंत्राने करण्यात आले असून पाणी साठवण क्षमतेत १.७०९% घट झालेली दिसून येते. म्हणजेच उपरोक्त धरणांसाठी अनुक्रमे ०.१०० टक्के, ०.१०४टक्के, ०.११६टक्के, ०.१२८टक्के व ०.२४४टक्के दराने वार्षिक घट झाली आहे.
मेरीने त्यांच्या तानसा धरणांसंबंधीच्या अभिप्रायामध्ये तानसा धरणात साठलेल्या गाळामुळे धरणाच्या पाणीपुरवठयाच्या क्षमतेवर परिणाम झाला नसल्याचे कळविले आहे. या संदर्भात धरणात साठलेला गाळ काढण्याबाबत केंद्रीय जल आयोग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून धरणातील गाळ काढण्याबाबत माहिती पुस्तके प्राप्त झाली.या माहितीचे अवलोकन केले असता वार्षिक सुमारे ०.२टक्के पर्यंत पाणी साठवण क्षमतेमध्ये घट झाली असता सदर धरणांचा गाळ काढण्याची आवश्यकता नसून दैनंदिन निरिक्षणाची गरज आहे असे प्रतित होते. त्यामुळे धरणातील गाळासंदर्भात स्थायी समितीच्या बैठकीत उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले की सात पैंकी दोन धरणे राज्य शासनाच्या अखत्यारित असून तीन धरणे आणि मुंबईतील विहार व तुळशी ही धरणे महापालिकेच्या मालकीची आहेत. त्यामुळे जिथे दोन टक्क्यांच्या आत पाण्यात घट होते तिथे गाळ काढण्याची गरज नाही असे नमुद करत विहार व तुळशीमधील गाळ काढल्यास साठवण क्षमता वाढेल असे बांगर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील सात प्रकल्पांमधील गाळ काढण्याचा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतरच विहार आणि तुळशीमधील गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दर पाच ते दहा वर्षांनी धरणांमधील गाळ काढण्याची मागणी मागील जून महिन्यामध्ये प्रशासनाकडे केली होती.
धरणांचे निर्मिती वर्ष
- विहार तलाव सन १८६०
- तुळशी तलाव सन १८७९
- तानसा धरण सन १८९२
- मोडक सागर धरण सन १९५४
- मध्य वैतरणा धरण सन २०१४
धरणांमधील गाळ सर्वेक्षणाचा अहवाल आणि कंसात पाणी साठवण क्षमतेतील घट, वार्षिक घट
- मे २०२४, विहार तलाव (१६.४२ टक्के)(वार्षिक घट : ०.१०० टक्के)
- मे २०२४,तुळशी धरण (१४.९८ टक्के ) (वार्षिक घट : ०.१०४टक्के)
- ऑगस्ट २०२२ तानसा धरण( १५.०२३ टक्के)(वार्षिक घट : ०.११६टक्के)
- ऑगस्ट २०२३ मोडक सागर धरण( ८.९८६ टक्के)( वार्षिक घट : ०.१२८टक्के)
- फेब्रुवारी २०२३ मध्य वैतरणा धरण( १.७०९टक्के) (वार्षिक घट : ०.२४४टक्के)